जिल्हा आरोग्य विभागाचे कोविड लसीकरण केंद्र बंद... नगरपरिषद आरोग्य केंद्रावर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:49+5:302021-03-21T04:21:49+5:30
पंढरपूर शहर व तालुक्याची लोकसंख्या ४ लाख ५० हजारांच्या आसपास आहे. यामध्ये शहराची लोकसंख्या १ लाख, तर ग्रामीण भागातील ...
पंढरपूर शहर व तालुक्याची लोकसंख्या ४ लाख ५० हजारांच्या आसपास आहे. यामध्ये शहराची लोकसंख्या १ लाख, तर ग्रामीण भागातील लोकसंख्या ३ लाख ५० हजारांच्या आसपास आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना कोविड लस देण्याचे काम ८ प्राथमिक केंद्रांमधून सुरू आहे. शहरात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात आहे व उपजिल्हा रुग्णालयातील संसर्गजन्य रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आले होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील १२ हजार, तर ४२ हजारांच्या आसपास लोकांना कोविड लस देण्याचे शासनाचे नियोजन आहे. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे, तर शहरातील लाइफलाइन हॉस्पिटल, श्री गणपती हॉस्पिटल, गॅलक्सी हॉस्पिटल व जनकल्याण हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयांत २५० रुपये शुल्क घेऊन कोविड लस देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी शासकीय केंद्रात कोविडची लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. शहरात एकाच ठिकाणी लस घेण्याची सोय असल्याकारणाने जुना कराड नाका परिसरातील केंद्रात रोज लस घेण्यासाठी शकडो लोकांची गर्दी होताना दिसून येत आहे. तशीच परिस्थिती ग्रामीण भागातदेखील आहे. यामुळे आरोग्य विभागाने पंढरपुरात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
शहरात आणखी लसीकरण केंद्रे सुरू करा
शहरात एकाच ठिकाणी कोविडची लस देण्यात येत आहे. त्यामुळे त्या आराेग्य केंद्रावर अधिक गर्दी होत आहे. यामुळे आरोग्य विभागाने शहरात आणखी ठिकाणी कोविड लसीकरण केंद्रे सुरू करण्याची मागणी धनंजय पंधे, नीलेश वांगीकर, भीमराव जाधव, सचिन पवार यांच्यासह अन्य नागरिकांनी केली आहे.
कोट ::::
उपजिल्हा रुग्णालयात अधिक रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे पुरेसे कर्मचारी मिळाल्यास पुन्हा कोविड लसीकरण केंद्र सुरू करू.
-डॉ. अरविंद गिराम, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर
फोटो : जुना कराड नाका परिसरातील नगर परिषदेच्या आरोग्य केंद्रावर कोविड लस घेण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी. (छाया : सचिन कांबळे)
फोटो :
उपजिल्हा रुग्णालयातील संसर्गजन्य रुग्णालयाच्या दरवाजावर कोेविड लस केंद्र बंद असल्याचे पत्र लावण्यात आले आहे.