मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; व्यापारी, उद्योजकांची बैठक!
By Appasaheb.patil | Published: March 9, 2024 06:15 PM2024-03-09T18:15:46+5:302024-03-09T18:16:48+5:30
सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा असल्याचाही केला उल्लेख
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा आहे. येथील उद्योजक व व्यापारी यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाच्या दिवशी सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कामगारांना पगारी पूर्ण दिवसाची सुट्टी द्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सर्व कामगारांचे योगदान मिळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी संघटना यांची लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. जिल्ह्यातील सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वतःसह त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचा ही सहभाग घ्यावा. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये उद्योजक व व्यापाऱ्यांकडे काम करणारा एक ही कामगार मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व आस्थापनांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मतदानाच्या दिवशी भर पगारी कामगारांना सुट्टी देण्याचे निर्देश आहेत. या निर्देशाचे पालन जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यापारी यांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान करण्याविषयी जागृत केले जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे १८ वर्षे वय पूर्ण झालेले आहे तसेच ज्यांनी आतापर्यंत मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली नाही त्यांची नाव नोंदणी करून त्यांना मतदान कार्ड देण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेतला जात असून, या उपक्रमास जिल्ह्यात चांगला प्रतिसादही मिळत आहे. असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.