घटस्फोटासाठी आलेली जोडपी ‘व्हॅलेंटाइन डे’ने पुन्हा एकत्र! कौटुंबिक न्यायालयाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 11:06 AM2022-02-15T11:06:04+5:302022-02-15T11:06:28+5:30
पुन्हा प्रपोज करीत संसाराची दुसरी इनिंग सुरू
रुपेश हेळवे
सोलापूर : पती-पत्नींमध्ये वाद होण्यास किरकोळ कारणंही असतात. हीच कारणं घटस्फोटापर्यंत नेतात. कौटुंबिक न्यायालयही सहजासहजी घटस्फोट देत नाहीत. दोघांचे मतपरिवर्तन करते. विचार करण्यासाठी वेळही दिला जातो. दोघांचा संसार पुन्हा थाटावा, बहरावा, यासाठी सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयाने सोमवारी ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून दहा जोडप्यांना एकत्र आणले. स्वत:मध्ये परिवर्तन झालेल्या या जोडप्यांनी एकमेकांना पुन्हा प्रपोज करीत संसाराची दुसरी इनिंग सुरू करताना शेवटच्या श्वासापर्यंत संसार टिकविण्याचा शब्दही दिला.
कौटुंबिक न्यायालयात वर्षभरात अनेक तक्रारी येत असतात. यातील अनेक जोडप्यांमधील भांडण हे विकोपाला गेलेले. न्यायालयाच्या समुपदेशन केंद्रात या मंडळींचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही झाला. त्या प्रयत्नाला सोमवारी चांगलेच यश आले. विवाह समुपदेशक नूरजहाँ मुलवाड आणि कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून या दहा जोडप्यांचे मतपरिवर्तन केले. दहाही जणांनी एकमेकांना प्रपोज करून तुटलेला संसार थाटण्याचा निर्धार केला. एक पुण्याईचं काम होतंय म्हटल्यावर न्यायालयाचा परिसर फुलं अन् फुग्यांनी सजविण्यात आला होता. यावेळी डॉ. आर. एम. काझी यांची वकील मंडळी उपस्थिती होती.
एखाद्या जोडप्याची तक्रार आल्यानंतर आम्ही त्या दोघांचे मनोमिलन कसे होईल, यासाठी जास्त प्रयत्न करतो. यामुळेच सोमवारी घटस्फोटासाठी आलेली जवळपास दहा जोडपी पुन्हा एकमेकांसोबत नांदण्यासाठी तयार झाली. यातील काही जोडपी तर दोन-तीन वर्षांपासून एकमेकांपासून विरहित होती. ही जोडपी पुन्हा एकत्र आली आहेत. - नूरजहाँ मुलवाढ, विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर