घटस्फोटितांना पुन्हा नव्यांशीच लग्न करायचंय; वधू-वर सूचक केंद्रांची माहिती; घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण ४० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 01:35 PM2022-11-20T13:35:56+5:302022-11-20T13:40:47+5:30
शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन् लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे वधू-वर सूचक केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. सहमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण सर्वच ठिकाणी वाढले आहेत.
दीपक दुपारगुडे -
सोलापूर : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात; पण त्या सुटायला किंवा तुटायला क्षुल्लक कारणही पुरेसे होते. याचाच प्रत्यय काही वर्षांत घटस्फोटांच्या वाढत्या संख्येतून येत आहे. या घटस्फोटितांना पुन्हा लग्न करायचं आहे, मात्र नव्यांशीच करायचे असल्याची बाब वधू-वर सूचक मंडळात नोंदलेल्या माहितीवरून पुढे आली आहे.
शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन् लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे वधू-वर सूचक केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. सहमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण सर्वच ठिकाणी वाढले आहेत.
तरुण पिढीत समजून घेण्याची क्षमता कमी
तरुण पिढीची समजून घेण्याची क्षमता कमी झाली आहे. दोघांचा इगो प्रॉब्लेम आणि दोघेही आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने आता पुढे काय होईल, याची चिंताही नसल्यामुळे प्रमाण अधिक आहे.
अलीकडच्या काळात नवदाम्पत्यांमध्ये एक वेगळाच ‘ट्रेंड’ निर्माण झाला आहे. तो म्हणजे एक वर्षापर्यंत एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज घ्यावयाचा, नाही जमले तर विभक्त होऊन घटस्फोट घ्यायचा.
- धनश्री स्वामी, चालक, वधू-वर सूचक केंद्र
घटस्फोटितांची अपेक्षा काय?
वधू-वर सूचक केंद्र, ऑनलाइन मॅरेज ब्युरो यांच्या वेबसाइट आणि कार्यालयात नाव नोंदणी करण्यामध्ये नवीन स्थळ जुळविण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के आहे, तर घटस्फोटितांचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.
घटस्फोटामागची कारणं... -
लॉकडाऊनमध्ये घाईगडबडीत लग्न, विनाविचारपूस, नोकरीची खात्री केली नाही, अशा कारणांनी घटस्फोट घेण्याचे प्रमाण अधिक आहे. दाम्पत्यांमध्ये वाद, मोबाइल आणि सोशल मीडिया, सतत मोबाइल वापरणे, पतीकडून क्रूर वागणूक, तसेच जोडप्यांच्या वादात घरच्यांचा हस्तक्षेप, विशेषत: आई-वडिलांच्या हस्तक्षेपामुळे नवरा-बायकोचे नाते तुटल्याचे समोर येत आहे.