सोलापूरचा दिवाळी फराळ पोहोचला गलवान खोऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:09+5:302020-12-06T04:23:09+5:30
सोलापूर : देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या जवानांना सोलापुरातील महिलांनी फराळ पाठविला होता. फराळ गलवान खोऱ्यातील जवानांनी स्वीकारून पत्रातून आपल्या ...
सोलापूर : देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या जवानांना सोलापुरातील महिलांनी फराळ पाठविला होता. फराळ गलवान खोऱ्यातील जवानांनी स्वीकारून पत्रातून आपल्या भगिनींचे आभार मानले. तसेच शत्रूंपासून देशाच्या सीमेचे सदैव रक्षण करण्याचे वचन दिले.
वजा तापमानाच्या थंडीतही देशाचे संरक्षण करण्याचे काम जवान करतात. कर्तव्यावर असल्यामुळे ते दिवाळी साजरी करू शकत नाहीत. म्हणून सोलापुरातील सैनिक मित्रपरिवारातर्फे गलवान खोऱ्यातील जवानांना फराळ देण्यात आला. काही दिवसांपूर्वी हा फराळ गलवान खोऱ्यातील जवानांपर्यंत पोहोचला. त्यांनी आनंदाने फराळ स्वीकारत आभार मानले.
सुभेदार मेजर पी. आर. चौहान यांनी सोलापुरातील सैनिक मित्रपरिवाराला पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी फराळ पाठवणे व जवानांच्या कार्याचे कौतुक केल्याबद्दल आभर मानताना शब्द अपुरे पडत असल्याचा उल्लेख केला. आपल्या शुभेच्छामुळे अधिक बळ मिळाले असून, देशाचा सन्मान हे आमचे पहिले कर्तव्य असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
-------
महिलांनी स्वत: बनवला फराळ
होटगी रोड येथील रघुनंदन अपार्टमेंटमधील सैनिक मित्रपरिवारातर्फे फराळ तयार करण्यात आला. गलवान येथील सैनिकांना लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळी, बालुशाही, बेसनाचे लाडू आदी पदार्थ स्वत: महिलांनी तयार करून दिले. नेहा मिरजगावकर, कविता मिरजगावकर, शाहिस्ता हकिम, दीपा मेहता, हेमा पटेल, लता गाढवे, सरिता रेड्डी, सुनीता भोसले, शोभा चव्हाण, गीता खमीतकर, पल्लवी बुरबुरे, विजया बुरबुरे, श्रद्धा, कृष्णा जगदेवी यांनी फराळ तयार केला. प्रीती राठी यांनी पणत्या तयार केल्या होत्या. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे फराळ सुपुर्द करण्यात आला होता.
*******