दिवाळीची गडबड आणि रुग्ण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:44 PM2018-12-27T12:44:29+5:302018-12-27T12:45:01+5:30
दिवाळीतला फराळ खाल्ला तर चालेल ना हे विचारायचे मात्र ते विसरले नाहीत. मीही त्यांना बजावून सांगितले की,त्यांना हा जो ...
दिवाळीतला फराळ खाल्ला तर चालेल ना हे विचारायचे मात्र ते विसरले नाहीत. मीही त्यांना बजावून सांगितले की,त्यांना हा जो बद्धकोष्ठतेचा आजार आहे तो अनेक महिन्यांचा आहे, त्यामुळे दिलेल्या औषधांचा परिणाम येण्यास थोडासा वेळ लागेल, गडबड करू नका. तूप खाल्ले की लगेच रूप येणार नाही, ही गोष्ट त्यांनी बहुतेक मुद्दामच नीट ऐकली नसावी.
दुसºया दिवशी सकाळी अभ्यंगस्नानाची गडबड माझ्या घरात चालू होती. माझी पत्नी अंजली आणि दोन्ही कन्या छानपैकी सुवासिक उटणे लावून अंग चोळत होत्या आणि माझा फोन खणखणला. फोनवर आमचा हाच तो व्हीआयपी रुग्ण होता. डॉक्टर, दिवाळीच्या शुभेच्छा! मलाही थोडेसे बरे वाटले, पण नंतर गाडी मूळ मुद्याकडे वळाली. डॉक्टर, काल रात्री तुम्ही दिलेली पावडर घेतली, पण आज सकाळी शौचास काही झाली नाही हो. मी त्यांना समजावून सांगितले काका, औषधाच्या एका डोसने तुम्हाला ती होणारच नाही, काही दिवस वाट बघावी लागेल. थोड्याशा नाराजीनेच त्यांनी फोन बंद केला.
सायंकाळी दिवाळीच्या निमित्ताने फराळासाठी काही मित्रांना घरी बोलावले होते. फराळाबरोबर छान गप्पा चालू होत्या. इतक्यात पुन्हा मोबाईल खणखणला. डॉक्टर, मी आता हॉस्पिटलला येऊ का तुमच्या? पोटात गॅस धरल्यासारखे झाले आहे आणि शौचास काही झाली नाही. मी त्यांना म्हटलं, अहो, दिवाळीसाठी मी दोन दिवस ओपीडी बंद ठेवलेली आहे. फक्त सीरियस रुग्ण आणि आॅपरेशन झालेले रुग्ण पाहण्यासाठीच मी हॉस्पिटलमध्ये ठराविक वेळ जातो. बापरे! म्हणजे माझे काही खरे नाही आता. माझा जीव जाणार बहुतेक यातच इति काका. पुन्हा एकदा काकांना शांत करून त्यांना समजावून सांगण्यात माझी पुढची पंधरा मिनिटे वाया गेली आणि फराळासाठी आलेले मित्र मात्र कंटाळून निघून गेले.
फराळाबरोबर शौचास कशी होते, शौच साफ होण्यासाठी काय करायला हवे, जेवणात काय घ्यायला हवे आणि काय नको, या पेशंटबरोबरच्या गप्पा माझ्या मित्रांना काही पचल्या नाहीत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी आरती चालू असताना पुन्हा एकदा माझा मोबाईल खणखणला. पलीकडे काका फोनवर. डॉक्टर, आम्हाला इकडे इतका त्रास होत आहे आणि तुम्ही तिकडे दिवाळी कसली साजरी करताय? काही तरी करा आमच्यासाठी तुमच्याऐवजी मीच एकदा शौचास जाऊन येतो, असे माझ्या जिभेवर आलेले शब्द मी परतवून लावले. मी दिलेले उपचार कसे बरोबर आहेत आणि ते नेटाने चालू ठेवणे जरुरी आहे, हे पुन्हा एकदा त्यांना समजावून सांगितले. बद्धकोष्ठतेसाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याची गरज नाही, हेही समजावून सांगितले. तसेच एनिमा देऊनही त्यांचे काम होणार नाही, हेही त्यांना समजावून सांगितले. नाखुशीनेच त्यांनी फोन पुन्हा एकदा आपटला. बहुधा या सर्जनला बद्धकोष्ठतेतले काही कळत नसावे, असा त्यांचा आविर्भाव होता.
पाडव्याच्या दिवशी पहाटे इकडे आमचे अभ्यंगस्नान चालू झाले आणि पुन्हा मोबाईल खणखणायला लागला. मी फोन उचलला आणि तिकडून काकांनी आॅर्डरच सोडली. डॉक्टर, आत्ताच्या आत्ता या बरे हॉस्पिटलला. मी अॅडमिट व्हायला येतोय. शेजारच्या डॉक्टरांकडे काल संध्याकाळी एनिमा घेतला मी, पण काही उपयोग झाला नाही. आता काय करायचे ते ठरवा तुम्ही. कशीबशी गडबडीत मी आंघोळ उरकली आणि आता हॉस्पिटलला निघणार तेवढ्यात अंजली म्हणाली, फराळ केल्याशिवाय हॉस्पिटलला जायचे नाही म्हणून नाईलाजानेच फराळाला बसलो.
फराळ खरेच खूप छान झाला होता. चकली अगदी कुरकुरीत झालेली होती. चिवडाही योग्य तितकाच झणझणीत होता. खोबºयाची करंजी म्हणजे माझा जीव की प्राण. मनापासून फराळ एन्जॉय करीत होतो, जिभेवर छानशी चव रेंगाळत होती, सोबत कौटुंबिक गप्पाही चालू होत्या आणि पुन्हा एकदा मोबाईल खणखणला. डॉक्टर, कुठे आहात तुम्ही? अरे बापरे, काका हॉस्पिटलला पोहोचले वाटतं. निघालोय, निघालोच आहे मी हॉस्पिटलला. नको, नको, काही गरज नाही काका रागावून बोलत असावेत, असे मला वाटले. पण काका पुढे बोलते झाले, काँग्रॅच्युलेशन्स डॉक्टर!
तुमच्या उपचारांना यश आले. मला भरपूर शौचास झाली बघा़ पुढची दहा मिनिटे काकांनी त्यांना शौचास कशी साफ झाली, पोट कसे हलके झाले, किती आनंद झाला, आता कसे बरे वाटते आहे याचे रसभरीत वर्णन केले. खुशखुशीत फराळाबरोबर मी तेही पचविले. काकांनाच नव्हे तर मलाही खरेच खूप आनंद झाला होता. निदान इथून पुढे तरी माझी दिवाळी सुखाची, समाधानाची आणि विनाबद्धकोष्ठतेची होणार होती. मला स्वत:ला आज पहिल्यांदाच कोणीतरी रिते झाल्याने मनापासून डॉक्टरांची दिवाळी साजरी झाली़
- डॉ. सचिन जम्मा
लॅप्रोस्कोपिक सर्जन, सोलापूर