उद्यापासून दिवाळीस प्रारंभ; नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन एकाच दिवशी
By appasaheb.patil | Published: October 24, 2019 07:50 AM2019-10-24T07:50:37+5:302019-10-24T07:53:00+5:30
पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती : आनंददायी दिवाळी साजरी करण्यासाठी सोलापूरकर सज्ज
सोलापूर : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण - उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसांत होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. यावर्षी शुक्रवार, दिनांक २५ आॅक्टोबर रोजी वसुबारस व धनत्रयोदशी तर रविवार, दिनांक २७ आॅक्टोबर रोजी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सर्व समाजाने दु:ख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात राहावयाचे असते. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात़ पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाºयांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात, कुटुंबात एकोपा राखला जातो.
दिवाळीचा मुहूर्त
- २५ आॅक्टोबर वसुबारस
सौभाग्यवती स्त्रिया एकभूक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे श्लोक म्हणून पूजन करतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.
४लक्ष्मीपूजन मुहूर्त - २७ आॅक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११़३० वाजेपर्यंत
४वहीपूजन मुहूर्त -२८ आॅक्टोबर २०१९ रोजी पहाटे १:५० ते ३:३०, पहाटे ५:३० ते ८:००, सकाळी ९:३० ते ११.००
२५ आॅक्टोबर रोजी धनत्रयोदशी, यमदीपदान
धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यू म्हणजेच अकाळी, अपघाताने मृत्यू येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा व श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा.
२७ आॅक्टोबरला लक्ष्मी-कुबेर पूजन
शेतकºयांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळअमावस्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावस्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावस्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते. कुबेराची प्रार्थना करावी. या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.
२७ आॅक्टोबरला नरक चतुर्दशी...
नरकासुराने १६ हजार १०८ स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
२८ आॅक्टोबरला बलिप्रतिपदा
- कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितले आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षाला सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचेही आयुष्य वाढते.
२९ आॅक्टोबरला यमद्वितीया
- नरक चतुर्दशी, अमावस्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीजसुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.