ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपातील भिंती सांगू लागल्या संत महात्म्यांच्या परंपरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:24 PM2019-07-10T13:24:46+5:302019-07-10T13:27:22+5:30
आषाढी यात्रा भाविकांची सोय; संतांच्या कार्याची भाविकांना ओळख करून देण्याचा प्रयत्न
सचिन कांबळे
पंढरपूर : संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपात सर्व संतांची व यात्रा सोहळ्याची माहिती सांगणारे छायाचित्र लावण्यात आले आहे. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना संतांचे महात्म्य अधिक समजू लागले आहे.
यात्रा कालावधीत रोज ४० ते ५५ हजारांच्या आसपास भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श करून दर्शन घेतात. यामुळे भाविकांना किमान १२ ते १८ तास दर्शन रांगेत थांबावे लागते. यात्रा कालावधीत दर्शन रांग गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जाते. हिंदू स्मशानभूमीजवळ १० पत्राशेडदेखील आहेत. त्यातच पुन्हा भाविकांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपातील अनेक मजले चढून मंदिरात प्रवेश करावा लागत होता. दर्शन मंडपातील मजले चढताना भाविकांना पाय व गुडघे दुखण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत होता.
यामुळे मंदिर समितीने दर्शन मंडपातील इतर मजले दर्शन रांगेसाठी बंद करून फक्त पहिला मजलाच दर्शन रांगेसाठी मंदिरात खुला केला आहे. यामुळे दर्शन रांगेतील भाविक तत्काळ पुढे जात आहे. त्याचबरोबर त्यांना होणारा त्रास देखील कमी झाला आहे.
परंतु प्रत्येक वर्षी दर्शन मंडपातून जाताना अनेक जण धूम्रपान करून भिंतीवर थुंकतात. दर्शन मंडपातील शौचालयाची देखील दुरवस्था झाली होती. यामुळे मंदिर समितीने दर्शन मंडपातील तळमजल्यात व पहिल्या मजल्यावर उत्कृष्ट पद्धतीची शौचालये बांधली आहेत. त्या ठिकाणी मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत पिण्याचे शुद्ध पाणी, एकादशीला उपवासाचे पदार्थ, चहा भाविकांना मोफत देण्यात येत आहे.
त्याचबरोबर दर्शन मंडपात विविध संतांचे महात्म्य सांगणारे छायाचित्र लावण्यात आले आहेत. यामुळे दर्शन मंडपातून आलेल्या प्रत्येक भाविकास प्रत्येक संताचे कार्य व इतिहास समजत आहे.
दर्शन मंडपात यांचे छायाचित्र
- संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखा मेळा, संत गोरा कुंभार महाराज, संत चांगदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, संत लखुबाई, संत सूरदास, गोपाळपूर येथील कृष्ण मंदिर, चंद्रभागेतील पुंडलिक मंदिर, विष्णुपद मंदिर, रिंगण सोहळा, विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती याबाबत माहिती सांगणारी छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
स्वच्छतेसाठी यंत्रणा
- श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपात स्वच्छता करण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून ६ कर्मचारी, ६ स्वयंसेवक व बी.एस.ए. संस्थेचे ६ कर्मचारी नेमण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितली.
दर्शन मंडपात रुग्णालय
- श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपातील दर्शन रांगेतील भाविकांना व मंदिर परिसरातील भाविकांना तत्काळ रुग्णसेवा मिळावी. यासाठी दर्शन मंडपात रुग्णालय सेवा सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी ६ डॉक्टर, परिचारिका, शिपाई उपलब्ध राहणार आहेत.