हिंमत हरु नका, काँग्रेसच सत्तेवर येईल
By Admin | Published: June 9, 2014 01:20 AM2014-06-09T01:20:37+5:302014-06-09T01:20:37+5:30
पदग्रहण सोहळा: यलगुलवार, वाघमारे यांनी व्यक्त केला विश्वास
सोलापूर : पराभव काँग्रेस पक्षासाठी नवीन नाही़ यापूर्वी अनेकदा काँग्रेस पराभवातून सावरली आहे़ यावेळीही सावरेल आणि पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास जागवत कार्यकर्त्यांनो हिम्मत हरु नका, कामाला लागा, असे आवाहन काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि महिला अध्यक्षा ज्योती वाघमारे यांनी केले़
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि महिलाध्यक्षा ज्योती वाघमारे यांचा पदग्रहण सोहळा आज काँग्रेस भवनात उत्साही वातावरणात पार पडला़ गर्दीने भरलेल्या सभागृहात नव्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोश भरण्याचा प्रयत्न केला़ अध्यक्षस्थानी माजी आमदार निर्मला ठोकळ होत्या़ तर व्यासपीठावर मावळते अध्यक्ष धर्मा भोसले, आमदार प्रणिती शिंदे, महापौर अलका राठोड, स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, महेश कोठे, धर्मण्णा सादूल, अॅड़ यु़ एऩ बेरिया, अमोल शिंदे, किसन मेकाले, आरिफ शेख, चेतन नरोटे, देवेंद्र भंडारे उपस्थित होते़
प्रारंभी अॅड़ बेरिया यांनी सोशल मीडियामुळे सामाजिक तणाव वाढत आहे़ मोहसीन शेखसारख्या निष्पाप तरुणाचा याच मीडियाने बळी घेतल्याचा निषेध करीत मीडियाविरोधात केंद्राने कडक कायदा करावा, असा ठराव मांडला़ तर अमोल शिंदे यांनी महापुरुषांची विटंबना करण्यास मदत करणाऱ्या सोशल मीडियाचा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध केला़ तोच मुद्दा महापौर अलका राठोड यांनी उचलून धरला़
प्रकाश यलगुलवार यांनी भाजपाने गोबेल्स तंत्राचा अवलंब करुन सत्ता काबीज केल्याचा आरोप केला़ ते म्हणाले, सुशीलकुमार शिंदे यांच्या कामाची दखल जनतेने घेतली नाही़, याची खंत वाटते़ आमदार प्रणिती शिंदे गोरगरीब जनतेचे प्रश्न घेऊन काम करतात़ त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांना शक्ती दिली पाहिजे़
ज्योती वाघमारे यांनी जात्यंध सरकारचा अनुभव जनता घेत आहे, असे सांगून प्रगती, सामाजिक सलोखा राखण्यासाठी युवक आणि महिलांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारण्याची गरज आहे, असे आवाहन केले़ झोपडपट्टीत जन्मलेल्या कामगाराच्या मुलीला काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी शिंदे कुटुंबीयांनी दिली़ याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना युवती आणि महिला मेळाव्यातून काँग्रेस संघटन वाढवण्याचा मनोदय व्यक्त केला़
आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत पारंपरिक मते काँग्रेस सोबत आहेत़ मात्र, नवा मतदार मीडियामुळे दुरावल्याची खंत व्यक्त केली़ देशासाठी सामाजिक ऐक्य महत्त्वाचे असून ते टिकवण्यासाठी तरुणांनी काँग्रेसला बळ देण्याचे आवाहन केले़ देवेंद्र भंडारे, धर्मण्णा सादूल, निर्मलाताई ठोकळ यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या़ ठोकळ यांच्या हस्ते प्रकाश यलगुलवार, ज्योती वाघमारे, धर्मा भोसले यांचा सत्कार करण्यात आला़
यावेळी केदार विभुते, सिद्धाराम चाकोते, शिवा बाटलीवाला, संजय हेमगड्डी, सुशीला आबुटे, मधुकर आठवले, सुवर्णा मलगोंडा, दत्तू बंदपट्टे, संजीवनी कुलकर्णी, राजकुमार हंचाटे आदी उपस्थित होते़ मात्र मावळत्या महिलाध्यक्षा सुमन जाधव, विश्वनाथ चाकोते यांच्यासह काँग्रेसचे शहरातील काही नेते अनुपस्थित राहिले़
---------------------------------------
बेरिया यांचे आत्मचिंतन
मोदी लाटेत काँग्रेसचा पराभव
माध्यमातून बाजू मांडण्यास आम्ही कमी पडलो़
आमच्यातला अतिआत्मविश्वास नडला़
सुशीलकुमार शिंदे यांच्या विकास कामाची पत्रकेच घरोघरी गेली, आम्ही नाही़
विकास कामांची माहिती देण्यात असमर्थ ठरलो़
नवमतदारांवर सोशल मीडियाचा दांडगा प्रभाव
कार्यकर्त्यांना नेत्यांकडून चांगली वागणूक नाही
जनतेचे प्रश्न समजून घेण्यात कसर
पाणीपट्टी कपातीचा निर्णय उशिराने घेतला
लढण्यासाठी कार्यकर्त्यांत जोश नव्हता
पक्षांतर करणाऱ्यांना पदे दिल्याने निष्ठावंत नाराज
---------------------------
स्पर्धक ते अध्यक्ष
नूतन अध्यक्षा ज्योती वाघमारे यांनी महाविद्यालयीन काळात महिला आरक्षण धोरण या विषयावर काँग्रेसने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता़ त्यात ज्योती वाघमारे प्रथम पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या़ त्यांच्या वक्तृत्व कलेने त्यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदापर्यंत नेले़ स्पर्धक ते अध्यक्ष हा प्रवास सुखद असल्याचा अनुभव त्यांनीच व्यक्त केला़
-------------------------
़़ठरावाला थंडा प्रतिसाद
सोशल मीडियाच्या विरोधात कडक कायदा करण्याचा अॅड़ बेरिया यांनी मांडलेल्या ठरावाला कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला़ मात्र, काँग्रेसचेच नूतन विधानपरिषद सदस्य रामहरी रुपनवर यांच्या अभिनंदन ठरावासाठी तासभर प्रतीक्षा करावी लागली़ विजय शाबादे यांनी ‘आम्ही तुमचेच किती दिवस ऐकायचे, मला एक ठराव मांडण्याची संधी द्या’ अशी हुज्जत घातल्यानंतर त्यांनी ठराव मांडला़ पण या ठरावाला चार-दोन जणांच्या टाळ्या मिळाल्या़ टाळ्या देणाऱ्यांनाही नंतर चुकल्यासारखे वाटले़ इतका थंडा प्रतिसाद ठरावाला मिळाला़