दाखल्यासाठी गर्दी करू नका
By admin | Published: July 24, 2014 01:32 AM2014-07-24T01:32:25+5:302014-07-24T01:32:25+5:30
मराठा समाजाच्या युवकांना आवाहन: जातीच्या दाखल्यासाठी मराठा सेवा संघाचे शिबीर
सोलापूर: मराठा समाजाच्या आरक्षणाचा आदेश उशिरा आल्याने जातीच्या दाखल्यासाठी गर्दी करू नका, असे आवाहन करीत दाखल्यासाठी सोबत जोडावयाच्या कागदपत्रांची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.
मराठा आरक्षण जात प्रमाणपत्र (दाखला) मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मराठा सेवा संघाच्या दत्त चौकातील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव माने-शेंडगे, तहसीलदार त्रिंबक ढेंगळे-पाटील, सोलापूर विद्यापीठाचे लेखाधिकारी संजय अनपट, नानासाहेब भोसले, राम गायकवाड, श्रीकांत घाडगे, नंदा शिंदे, लता ढेरे, सुमन खपाले, गुणमाला पाटील, निर्मला शेळवणे आदी उपस्थित होते. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी या आदेशाचा फायदा होणार नाही, अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना याचा फायदा होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले. शिक्षणासाठी ज्यांना सध्या आवश्यक आहे अशांनीच दाखल्यासाठी अर्ज केले तर दाखले देणे सोयीचे होईल व आरक्षणाचा फायदा होईल, सर्वांनीच गर्दी केली तर शिक्षणासाठी गरज असलेल्यांनाही दाखले देणे प्रशासनाला कठीण होईल, असे देशमुख यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उत्तमराव माने-शेंडगे यांनी केले. यावेळी महेश सावंत, मनीषा नलावडे, अविनाश गोडसे, हरिभाऊ चव्हाण, पोपट लोंढे, राजेंद्र मिसाळ, रवींद्र पवार तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------------------
आवश्यक पुरावे...
१३ आॅक्टोबर १९६७ पूर्वीचा मराठा उल्लेख असलेला पुरावा हवा
हिंदू बिगरमागास उल्लेख असेल तरी मराठा उल्लेख असलेला नातेवाईकांचा पुरावा हवाच
सेतूमधील विहित नमुन्यातील अर्जच ग्राह्य धरला जाईल
जुन्या काळातील मराठा उल्लेख असलेला कागदही चालेल
जातीचा दाखला मिळाल्याश्विाय नॉनक्रिमिलेयरचा दाखला मिळत नाही
------------------------------
सुट्टीतही सेतू सुरू ठेवण्याची मागणी...
आरक्षणाचा आदेश २२ जुलै रोजी आला तर अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया २८ जुलैपर्यंतच आहे. मराठा समाजाच्या शिक्षण घेणाऱ्या तरुणांना दाखले मिळण्यासाठी जिल्ह्यातील सेतू कार्यालये व सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कार्यालय शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याची मागणी जिल्हाध्यक्ष उत्तमराव माने-शेंडगे यांनी यावेळी केली. तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.