बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:23 AM2021-03-23T04:23:40+5:302021-03-23T04:23:40+5:30
एखाद्या डीपीवरील ज्या शेतकऱ्यांनी नियमानुसार बिल भरले आहे, परंतु त्या त्यावरील सर्वच शेतकरी जोपर्यंत बिल भरत नाहीत तोपर्यंत विद्युतपुरवठा ...
एखाद्या डीपीवरील ज्या शेतकऱ्यांनी नियमानुसार बिल भरले आहे, परंतु त्या त्यावरील सर्वच शेतकरी जोपर्यंत बिल भरत नाहीत तोपर्यंत विद्युतपुरवठा खंडित केला जात होता. ही चुकीची पद्धत बंद करून ज्या शेतकऱ्यांनी बिल भरले आहे, अशा शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, या मागणीसाठी संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान उपकार्यकारी अभियंता यू. जे. जाधव व पोलीस उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी संजय कोकाटे व उपस्थितांना प्रत्यक्ष रोडवर बसून आंदोलन न करता बाजूस थांबून या प्रश्नावर चर्चा करण्याचे आवाहन केले. त्यानंतर संजय कोकाटे यांच्यासह आंदोलक शेतकरी व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जाधव यांच्यात चर्चा झाली. जाधव यांनी अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर पडळकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला व आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या कळवल्या. त्यानंतर बिल भरणाऱ्या एकाही शेतकऱ्याचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे आदेश पडळकर यांनी दिले. तसेच सर्वच शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत देण्यात यावी. तो पर्यंत वीजपुरवठा चालू ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
संजय कोकाटे म्हणाले, शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनीही बिल भरून सहकार्य करावे. यावेळी माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, रयत क्रांतीचे जिल्हा संघटक प्रा. सुहास पाटील, रामभाऊ टकले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या आंदोलनात भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे, राजाभाऊ चवरे,, बबन केचे, सरपंच विजय पवार, पोपट अनपट, निवृत्ती तांबवे, योगेश पाटील, विनोद पाटील, सुधीर महाडिक, भाजपच्या महिला तालुका उपाध्यक्ष माया माने, गिरीश ताबे, औदुंबर महाडिक, रिपाइंचे जयवंत पोळ, तुकाराम पाटील, विठ्ठल गायकवाड यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी वाहतूक सुरळीत ठेवून चोख बंदोबस्त ठेवला होता.
बिल न दिल्यास वीजपुरवठा होणार बंद
पैसे भरणाऱ्या एकाही शेतकऱ्याचा वीज खंडित करण्यात येणार नाही. जे शेतकरी पैसे भरणार नाहीत त्यांचाच वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. शेतकऱ्यांनी एकरकमी थकीत बिल भरून शासनाने जाहीर केलेल्या ६६ टक्के वीज बिल माफीचाही फायदा घ्यावा.
यू.जे. जाधव,
उपकार्यकारी अभियंता, टेंभुर्णी.
फोटो
२२टेंभुर्णी
ओळी
टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलनात बोलताना संजय कोकाटे.