नका खाऊ तंबाखू, नका लावू चुना, हा जन्म नाही पुन्हा पुन्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:30 AM2019-07-11T10:30:09+5:302019-07-11T10:31:58+5:30
पंढरपुर आषाढी वारी; माऊलींच्या पालखी सोहळ्यात व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते
किरण जाधव
वेळापूर : ‘नका खाऊ तंबाखू, नका लावू चुना, माणसाचा जन्म नाही पुन्हा पुन्हा’, ‘ओढाल सिगारेट, विडी तर चढाल मृत्यूची शिडी’ या वाक्यातून आणि भारुड, कविता, पथनाट्याच्या माध्यमातून वारकºयांना प्रबोधन करण्याचे कार्य माऊलींच्या पालखी सोहळ्यात व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते करीत असल्याचे दिसून आले.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व्यसनांचे दुष्परिणाम दाखविणारे डिजिटल फलक, माहिती पत्रक, प्रबोधिका व व्यसनामुळे तोंडाची होणारी विद्रुपता दाखवणारे विविध मुखवटे घालून व्यसनांची गंभीरता ते सांगतात. वारकºयांमध्ये मिसळून त्यांना व्यसनांचे दुष्परिणाम पटवून देतात. यामुळे कित्येक स्त्री-पुरुष वारकरी व्यसने सोडण्याची माऊलींच्या साक्षीने शपथ घेतात. व्यसनमुक्तीबरोबरच गोरक्षा, सेंद्रिय शेती, वृक्षसंवर्धन, निर्मलग्राम आणि शौचालययुक्त गाव या विषयावरही प्रबोधन करण्यात येते.
प्रा़ धनंजय देशमुख म्हणाले, वर्तमानकाळात वाढत चाललेली व्यसनाधिनता नष्ट व्हावी़ हा सोहळा पवित्र असून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी व्हावा यासाठी नामसाधनेबरोबरच प्रबोधनाची आवश्यकता आहे़ त्यामुळे १५ वर्षांपासून हा उपक्रम बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणामही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदीपासून संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, राजेंद्र कानडे, दादा पाचपुते, हनुमंत सपकळ, रवींद्र मुजुमले हे परिश्रम घेत आहेत़ यावेळी राज्याध्यक्ष शहाजी काळे, सोलापूर व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष दीपक जाधव, माळशिरस तालुकाध्यक्ष विजय पराडे, सुनील पाटील, तानाजी पांडुळे, राजू घाडगे, विजय बंडगर, दिग्विजय देशमुख आदी उपस्थित होते.