सोलापूरकरांच्या घामातून उभारलेली वास्तू उद्ध्वस्त करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:11 PM2019-07-02T12:11:36+5:302019-07-02T12:14:27+5:30
सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तूंचे ‘एनजी’च्या जागेत संग्रहालय उभारा
सोलापूर : बंद असलेल्या नरसिंग गिरजी कापड गिरणीच्या जागेवरील जुन्या इमारती पाडण्यासाठी निविदा राज्य वस्त्रोद्योग महामंडळाने प्रसिद्ध केली आहे. सोलापूरच्या सध्या झालेल्या विकासात या एन. जी. मिलचे अमूल्य योगदान आहे. वारद यांनी बांधलेल्या या इमारतीचे वास्तुशास्त्रदृष्ट्या महत्त्वही आहे. ज्या मिलने सोलापूरच्या पाच पिढ्या जगवल्या त्याची इमारत पाडण्यात येत आहे. ही इमारत वाचविण्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून सोलापूरकरांनी लढा सुरू केला आहे. सोलापूरकरांच्या घामातून उभारलेली वास्तू उद्ध्वस्त न करता जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय एन. जी. मिलच्या जागेत उभारता येऊ शकते, असा सूर शहरातील मान्यवरांमधून निघाला. या वास्तूमध्ये लोकमान्य टिळक आणि बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी मुक्काम केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सोलापुरातील ऐतिहासिक वास्तू सुरक्षित राहावी. ही वास्तू न पाडता येथे आणखी काही चांगले करता येईल का, या बाबींवर चर्चा करण्यासाठी लोकमत भवन येथे ‘कॉफी टेबल’चे आयोजन करण्यात आले होते. ‘कॉफी टेबल’साठी एन. जी. मिलमध्ये १९५१ पासून १९९२ पर्यंत काम करणारे बाबुराव तळीखेडे, कामगार नेते रवींद्र मेकाशी, इंटॅकच्या प्रमुख सीमंतिनी चाफळकर, नितीन अणवेकर यांनी सहभाग घेतला. या चर्चेत मान्यवरांनी आपली मते मांडली.
एन. जी. मिल वास्तू बांधणीच्या पद्धतीवर आर्किटेक अभ्यासक्रमाच्या अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन केले आहे. ही इमारत बांधताना भारतीय तसेच युरोपीय शैलीचा वापर करण्यात आला आहे. आपल्या परिसरात आढळणारे विविध प्रकारचे रंगीत दगड या बांधकामात वापरले आहेत. आपल्या देशातही स्वदेशी कापड तयार व्हावे, अशी प्रेरणा लोकमान्य टिळकांकडून घेऊन १८७५ मध्ये या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली.
हे काम करणे अवघड असल्याचे लक्षात आल्यानंतर वारदांनी गिरजी यांच्या मदतीने मिलची उभारणी केली. एन. जी. मिल सरकारच्या ताब्यात असल्याने त्यांच्या दृष्टीने ही मिल सुरू ठेवणे अशक्य नव्हते. एन. जी. मिल ही २००२ मध्ये बंद झाली.
सोलापूरकरांना मोकळ्या जागेत फिरण्यासाठी कोणतेही ठिकाण नाही. मिलच्या जागेत एखादे संग्रहालय उभे क रायला हवे. असे केल्यास मिलच्या वास्तूची जपणूक होईल व सोलापुरात एक पर्यटन स्थळ तयार होईल. याचा वापर फक्त काही उच्चभू्र लोकांसाठी न होता सामान्य लोकांसाठी व्हायला हवा, अशी अपेक्षा सीमंतिनी चाफळकर यांनी व्यक्त केली.
हेरिटेज म्हणजे काय ?
- एखाद्या वास्तूचे ऐतिहासिक, राजकीय व सांस्कृतिक महत्त्व काय आहे. वास्तू रचना आणि बांधकामाचा काळ कधीचा आहे. त्या बांधकामातील वैशिष्ट्ये, सजावट आणि वास्तूचे पुढील काळासाठी जतन तसेच संबंधित वास्तूशी असलेले नाते या निकषांवर एखादी वास्तू हेरिटेजसाठी निश्चित केली जाते. या सर्व बाबींचा विचार केल्यास एन. जी. मिलच्या जागेत तसे महत्त्व व इतिहास आहे. ग्रेड वनमध्ये एन. जी. मिलच्या वास्तूचा समावेश होतो. लोकमान्य टिळक व महाराजे सयाजीराव गायकवाड हे देखील एन. जी. मिलमध्ये आले होते.
सोलापूरच्या विकासात एन. जी. मिलचे महत्त्वाचे योगदान आहे. इतर मिलच्या तुलनेने या इमारतीचे बांधकाम हे वेगळे आहे. इमारत व परिसर पाहिल्यानंतर काम करायला उत्साह यायचा. आमचे काम हे तीन शिफ्टमध्ये चालत होते. त्याकाळी या मिलमधून तयार झालेले कापड संपूर्ण देशात जात होते.
- बाबुराव तळीखेडे, सेवानिवृत्त कर्मचारी, एन. जी. मिल.
सोलापूरची ओळख ही गिरणगाव अशी होती. ही ओळख मिळण्यात एन. जी. मिलचा महत्त्वाचा वाटा आहे. काही कारणांमुळे मिलवर आर्थिक संकट आले असताना कामगारांनी वेतन कपात सहन करून गिरणी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. १९९१ मध्ये जागतिकीकरणाला सुरुवात झाली. मिल सरकारच्या ताब्यात गेल्यामुळे त्यांना मिल चालू ठेवणे अशक्य नव्हते.
- रवींद्र मोकाशी,
कामगार नेते.
जगभरामध्ये पुरातन वास्तू न पाडता त्यांचा वापर केल्याची अनेक उदाहरणे आहेत. एन. जी. मिलची वास्तू बांधण्यात स्थानिक लोकांचा सहभाग होता. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे ही मिल आहे. आता पुन्हा अशी वास्तू बांधणे अशक्य आहे. मिलच्या परिसरातील महत्त्व नसलेल्या जागी बांधकाम करता येऊ शकते.
- सीमंतिनी चाफळकर,
प्रमुख इंटॅक.
आपल्या शहरात एन. जी. मिलचा ऐतिहासिक वारसा आहे. मात्र, तो आपल्याला पाहायला मिळत नाही. हनुमान जयंती व गड्डा यात्रेदरम्यान होणाºया तैलाभिषेक विधीच्या वेळीच मिलचा दरवाजा उघडला जातो. आज शहरातील उत्साही लोकांना हा वारसा पाहायचा आहे. रिपन हॉल न पाडता त्याचा जसा वापर सुरू आहे तसा या इमारतीचाही वापर केला जाऊ शकतो.
- नितीन अणवेकर,
इतिहास अभ्यासक.