कला शाखेला गाळ समजू नका - अविनाश धर्माधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:30 PM2018-06-29T15:30:12+5:302018-06-29T15:32:18+5:30
दहावी-बारावीनंतरचे करिअर आणि स्पर्धा परीक्षांवर सोलापूरात मार्गदर्शन
सोलापूर : ज्यांचे गणित आणि जीवशास्त्र चांगले आहे त्यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेकडे वळावे़ वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन सी़ ए़ , आयसीडब्ल्यूए, एमबीए, लॉ आदी अभ्यासक्रम पूर्ण करु शकता़ कला शाखेला गाळ समजणे पूर्णत: चुकीचे आहे़ इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भाषा आदी विषय घेऊन करिअर करता येते़ उत्तम काव्य करणारे कवी कुसुमाग्रज बुद्धिवान नाहीत का? क्रिकेट, अभिनय, उत्तम शेती करणे, फुलांची रचना करणे हेही आवडीचे विषय होऊ शकतात, असे आवाहन चाणक्य मंडल परिवाराचे संचालक आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले़
संगमेश्वर महाविद्यालय येथे चाणक्य मंडल परिवाराचे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु होत आहे़ त्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर महाविद्यालयाच्या वतीने ‘दहावी-बारावीनंतरचे करिअर आणि स्पर्धा परीक्षा’ विषयावर धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते़ सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात हे व्याख्यान पार पडले़ याप्रसंगी वक्ते म्हणून मार्गदर्शन करीत असताना त्यांनी वरील विधान केले़ यावेळी व्यासपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, प्राचार्या डॉ़ व्ही़ एस़ राजमान्य, संगमेश्वर महाविद्यालय कौशल्य विकास कें द्राचे संचालक डॉ़ राजशेखर येळीकर यांची उपस्थिती होती़
धर्माधिकारी पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षेतील यशानंतर मुलाखतीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांची कसोटी लागते़ विद्यार्थी अवघड प्रश्नांना उत्तर देताना गडबडून जातो का की, शांतपणे स्मितहास्य करून ‘आयएम सॉरी’ हे आत्मविश्वासाने म्हणतो हेही पाहिले जाते़ प्रशासकीय अधिकारी होणे हे देशसेवेची, लोकसेवेची चांगली संधी आहे़ यामुळे समाज परिवर्तन व विकास कार्यक्रम राबविण्यासाठी सहभागी होता येते, हे महत्त्वाचे आहे़
यावेळी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांनी केवळ अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राकडे न वळता स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचे आवाहन केले़ प्रद्युम्न कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले़ त्यानंतर सामुदायिक उपासना झाली़ यावेळी डॉ़ येळीकर यांनी संगमेश्वर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राची माहिती दिली़