आंबेडकर जयंती सोहळ्यात राजकीय पक्षांचे झेंडे अन् बॅनर्सचा वापर करू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 02:10 PM2019-04-09T14:10:55+5:302019-04-09T14:17:16+5:30
भीम जयंतीची तयारी...परंपरा सोलापुरी...: सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचे आवाहन, पोलीस आयुक्तालयात झाली शांतता कमिटीची बैठक
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनिमित्त सध्या जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असताना राजकीय पक्षाचा झेंडा, फोटो आणि बॅनर याचा वापर होणार नाही याची काळजी घ्या. गुन्हे मुक्त डॉ. आंबेडकर जयंती साजरी करा, असे आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी उत्सव मंडळांना केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पोलीस आयुक्त महादेव तांबडे बोलत होते. यावेळी मंचावर महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस उपायुक्त शशिकांत महानवर, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. दीपाली काळे, नगर अभियंता संदीप कारंजे उपस्थित होते.
बैठकीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दशरथ कसबे, ज्येष्ठ नेते सुभान बनसोडे, रिपाइं (गवई) प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, के. डी. कांबळे, शशिकांत कांबळे, अशोक जानराव, अजित गायकवाड, बसपाचे प्रदेश प्रभारी अॅड. संजीव सदाफुले, मिलिंद प्रक्षाळे, बबलू गायकवाड, सत्यजित वाघमोडे, विनोद इंगळे, सिद्धेश्वर पांडगळे, रसूल पठाण, पिंटू ढावरे, संध्या काळे, कविता चौधरी, प्रणोती जाधव आदी विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त म्हणाले की, २३ एप्रिल रोजी माढा लोकसभेसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र आचारसंहिता असणार आहे, त्यामुळे याचा भंग होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. मिरवणूक मार्गावर असलेल्या समस्या महापालिका प्रशासनाकडून सोडवल्या जातील. जयंती उत्सव काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पोलीस बंदोबस्त दिला जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिले. सूत्रसंचालन सहायक पोलीस आयुक्त डॉ. दीपाली काळे यांनी केले. आभार संदीप कारंजे यांनी मानले.
सदस्यांनी मांडल्या सूचना...
- बैठकीत राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, बाळासाहेब वाघमारे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, प्रमोद गायकवाड, नगरसेवक रवी गायकवाड, अशोक जानराव, राहुल सरवदे आदींनी जयंती उत्सव व मिरवणुकीबाबत सूचना मांडल्या. राजाभाऊ सरवदे यांनी मिरवणूक मार्गावरील अडथळे सांगून त्या दूर करण्याची मागणी केली. प्रमोद गायकवाड यांनी पोलिसांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. राजाभाऊ इंगळे यांनी भीमसैनिक सहकार्य करतील असे आश्वासन दिले. आनंद चंदनशिवे यांनी पाणीपुरवठा वेळेत करण्याची मागणी केली. बाळासाहेब वाघमारे यांनी जी.एम. चौकातील एस.टी. वाहतूक बंद करण्याची सूचना केली. युवराज पवार यांनी झेंडे, बॅनर लावण्यासाठी वेळेचे बंधन घालण्याची व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.