वारीला परवानगी द्या म्हणणाऱ्यांना प्रेतवाहिनी चंद्रभागा करायची आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:15 AM2021-06-23T04:15:41+5:302021-06-23T04:15:41+5:30
पंढरपूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात गर्दी करून मृत्यूचे कारण बनवून लाखो वारकऱ्यांच्या जिवाशी खेळा, अशी वारकरी संप्रदाय अथवा वारकरी ...
पंढरपूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात गर्दी करून मृत्यूचे कारण बनवून लाखो वारकऱ्यांच्या जिवाशी खेळा, अशी वारकरी संप्रदाय अथवा वारकरी संतांची शिकवणच नाही. असे असताना पंढरपूरला जाण्यासाठी आषाढी वारीला परवानगी द्या, अशी मागणी करणे म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आरोग्याशी खेळणे होईल. वारीला परवानगी द्या, अशी मागणी करणाऱ्यांना प्रेतवाहिनी चंद्रभागा करायची आहे का? असा सवाल विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आला आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्या वतीने कार्याध्यक्ष तसेच बडवे उत्पात आंदोलनातील प्रमुख नेते कॉ. धनाजी गुरव आणि उपाध्यक्ष व वारी समतेची या पुस्तकाचे लेखक विजय मांडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘अठरापगड जातीतील बहुजन समाजातील वारकरी संतांना ज्या प्रवृत्तींनी छळले, त्याच प्रवृत्तीचे काही मूठभर लोक आज वारीला परवानगी द्या अशी मागणी करीत आहेत. म्हणजेच ज्यांचा वारीशी काहीएक संबंध नाही, त्यांनी वारीला परवानगी द्या म्हणणे असे झाले आहे.
..तर वारीनंतर संसर्ग गावोगावी पोहोचू शकतो
कोरोनासारख्या महामारीच्या काळात यांना वारकरी, वारकरी संत आणि पंढरीची वारी आठवू लागली आहे. वारकरी संप्रदायात त्यांना कवडीचीही किंमत नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे. कोरोनाचा हा संसर्ग वारी सुरू झाल्यावर गावोगावी पोहोचेल आणि कोरोना सर्वदूर पोहोचल्यानंतर तो आटोक्यात आणणे कठीण होईल. कुंभमेळ्याला परवानगी दिल्यानंतर ज्याप्रमाणे त्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला, त्याच पद्धतीने वारीच्या मार्गावरही हा प्रसार होईल. आम्ही वारीला परवानगी देऊ नये याच विचाराचे आहोत, असे पत्रकात कॉ. धनाजी गुरव व विजय मांडके यांनी म्हटले आहे.