तुमच्या घरी बंद पडलेली गाडी आहे काय ? मग पर्यावरण कर किती थकला हे तपासा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:51 PM2021-08-14T16:51:41+5:302021-08-14T16:51:47+5:30
अनेकांना हे नाही माहिती: आता मोदी यांच्या स्क्रॅप पॉलीशीचा होणार फायदा:
सोलापूर: तुमच्या घरी आजोबा, वडीलांनी खरेदी केलेली पण आता बंद असलेली चारचाकी किंवा एखादे वाहन आहे का/ असेल तर या वाहनांचा पर्यावरण कर किती थकला आहे हे तुम्ही विचारही करू शकणार नाही. अशा वाहनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केलेल्या स्क्रॅप पॉलीशीचा आता फायदा होणार आहे.
आपण आपल्या घरगुती किंवा वैयक्तिक वापरासाठी घेतलेल्या चारचाकी किंवा दुचाकी वाहनांचे वय १५ वर्षे आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आरटीओकडे अर्ज केल्यानंतर आणखी ५ वर्षे फिटनेस मिळू शकते. पण बरेचजण एकदा वाहन घेतले की पुन्हा सारे विसरून जातात. पंधरा वर्षानंतर वाहन रिपासिंग केले नाही अथवा २० वर्षानंतर वाहन स्क्रॅपमध्ये काढले नाही तर हे वाहन अजून चालूच आहे असे समजून त्या खात्यावर पर्यावरण कराची रक्कम जमा होत जाते. बऱ्याच वर्षानंतर ही रक्कम मोठी होते. राज्यभरात आरटीओचा अशा प्रकारचा एक हजार कोटी कर थकीत आहे अशी माहिती परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. शासनाने हा कर वसूल करायचा असे ठरविले तर वाहनधारकांची मोठी अडचण होणार आहे.
स्क्रॅप पॉलिसाचा फायदा
अनेकांच्या घराजवळ जुनी वाहने पडून आहेत. वाहनांचे आयुष्य संपल्यानंतर रितसर अर्ज करून ती स्क्रॅपमध्ये काढावी लागतात. बंद वाहने व विक्रीमुळे याकडे कोणी लक्ष देत नाही. पण आरटीओच्या रेकॉर्डवर ही वाहने चालूच आहेत असे दिसते. त्यामुळे पर्यावरण कराचे मीटर चालूच राहते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्क्रॅप पॉलीशी जाहीर केली आहे. त्यामुळे वाहनांचे आयुष्य संपल्यानंतर वाहनधारकांना आपोआप नोटीस जाईल व ते वाहन स्रॅकपमध्ये काढले जाणार असल्याचे परिवहन आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.
ई वाहनांना प्राधान्य
पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना आता प्राधान्य दिले आहे. या वाहनांना आरटीओचा कर नाही. जादा क्षमतेच्या वाहनांची मात्र नोंदणी करावी लागते. पक्के वाहन परवाना देण्याचे नियम कडक केले जाणार आहेत. यासाठी अत्याधुनिक ट्रॅक बनविण्यात येणार आहे.