श्रीदेवींचा मृत्यूपश्चात सन्मान करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 09:07 PM2018-02-27T21:07:12+5:302018-02-27T21:07:12+5:30
श्रीदेवी ही माझ्या कॉलेजच्या जीवनात मनावर कायमचा ठसा ठेवून गेलेली अभिनेत्री. तिच्या अकाली मृत्यूने तिचे कुुटुंबीय व चाहते दु:खातून सावरत नाहीत तोपर्यंत समाज माध्यमांवर तिचा मृत्यू का झाला, याबद्दलच्या विकृत तर्काचे माहोल उठले.
श्रीदेवी ही माझ्या कॉलेजच्या जीवनात मनावर कायमचा ठसा ठेवून गेलेली अभिनेत्री. तिच्या अकाली मृत्यूने तिचे कुुटुंबीय व चाहते दु:खातून सावरत नाहीत तोपर्यंत समाज माध्यमांवर तिचा मृत्यू का झाला, याबद्दलच्या विकृत तर्काचे माहोल उठले. त्यामध्ये या गुणी अभिनेत्रीच्या गुणाचे मूल्यमापन करणारे व आठवणीचे कढ काढणारे लेखन अक्षरश: वाहून गेले. व्हॉट्सअॅप विद्यापीठातल्या पदवीधरांनी वजन कमी करणे, सौंदर्य उपचार कसे घातक आहेत व नैसर्गिक जीवनशैली कशी चांगली यावर प्रवचने झोडणे सुरू केले. सौंदर्योपचारामुळे हृदयक्रिया बंद पडली, असे तारे तोडत असतानाच श्रीदेवीचा मृत्यू दारू प्यायल्यामुळे झाला असावा, असा ‘कहानी मे टिष्ट्वस्ट’ झाला. आता दारू पिणे कसे हानिकारक आहे व प्यायचीच तर ती स्वदेशी व शास्त्रोक्त कशी प्यावी, यावर पोस्टींचा पूर आला नाही तरच नवल. श्रीदेवीचा चाहता व सौंदर्यशास्त्रातला तज्ज्ञ म्हणून या समाज माध्यमांवरच्या वाह्यात चर्चेला उत्तर देण्याची मला इच्छा झाली.
या विषयाला पहिल्यांदा तोंड फोडले ते पियली गांगुली या गायिकेने. तिने तिच्या थोबाड पुस्तकाच्या भिंतीवर लिहिले, ‘तिचे इम्प्लांट, वजन घटवणे व नियमित बोटॉक्स घेणे यामुळेच तिची हृदयक्रिया बंद पडली असावी.’ मी त्वचारोगतज्ज्ञ असल्याने हे विधान किती अडाणीपणाचे आहे हे मला तर कळाले; पण बरेच जण त्यात वाहवत गेले. सौंदर्य उपचार व बोटॉक्स, फिलर इंजेक्शन हे दुर्दैवाने लोकप्रिय होण्यापेक्षा ‘गॉसिप’लाच जास्त बळी पडले. सौंदर्य उपचार व सौंदर्यतारका याबद्दल चांगल्यापेक्षा वाईटच बोलायला लोकांना जास्त आवडते. याचा एकेका मुद्यावर परामर्श घेऊ. सुंदर, तरुण व बारीक दिसणे ही माणसाची नैसर्गिक ऊर्मी आहे. त्यासाठी घरगुती वा वैद्यकीय प्रयत्न करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड-निवड असते. त्याचा आपण आदर करणार की आपली मते इतरांवर लादणार?
मी चेहºयावर मेकअप लावणार की नाही, इतकं ते वैयक्तिक आहे. सुंदर दिसण्याचे हे प्रयत्न सुरक्षित आहेत का? आधुनिक वैद्यकातील बहुतांश उपचार हे सुरक्षित व अन्न व औषध प्रशासनाने प्रमाणित केलेले असतात. शिवाय उपचार करणारे त्वचारोगतज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन हे उच्च बुद्धिमत्ता व अनुभवाच्या गटात मोडतात. (त्याशिवाय या पैसेवाल्या तारका आपला चेहरा कसा त्यांच्या हाती सोपवतील?)
बोटॉक्स उपचार सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरतात व ज्या प्रमाणात हे वापरले जाते त्यामुळे हृदयक्रिया बंद पडणे हे केवळ अशक्य आहे. प्लास्टिक सर्जरीमध्ये स्तनांचा आकार वाढवण्यासाठी इम्प्लांट वापरतात. त्यांना अॅलर्जी येणे हे २० वर्षांपूर्वी शक्य होते. सध्या वापरले जाणारे स्तन, नाक शस्त्रक्रियेतील इम्प्लांट अत्यंत सुरक्षित असतात. अगदीच कमी दर्जाचे साधन वापरले तर फार फार तर अॅलर्जी होईल, हृदयक्रिया बंद पडणार नाही. आता वजन कमी करण्याबद्दल अन्न वर्ज्य करून किंवा ओकाºया काढून वजन कमी करणे हे आरोग्यदृष्ट्या अयोग्यच.
- डॉ. नितीन ढेपे
(एम. डी.) त्वचारोग व सौंदर्यतज्ज्ञ