डॉक्टरने दोन चोरट्यांना पकडले
By admin | Published: May 23, 2014 01:12 AM2014-05-23T01:12:21+5:302014-05-23T01:12:21+5:30
सांगोला : पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेला लुटणार्या दोन चोरट्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरने पाठलाग करुन पकडले. ही घटना गुरुवारी दुपारी पारे येथील तलावाजवळ घडली.
सांगोला : पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेला लुटणार्या दोन चोरट्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरने पाठलाग करुन पकडले. ही घटना गुरुवारी दुपारी पारे येथील तलावाजवळ घडली. रखबाई संदिपान यमगर (वय ६५, रा. घेरडी, यमगरवाडी, ता. सांगोला) असे वृद्ध महिलेचे नाव असून सुभाष उर्फ लक्ष्मण मारुती पवार (वय २०) व विशाल उर्फ बाबा इराप्पा पवार (वय १८ दोघेही रा. जत, विठ्ठलनगर, जि. सांगली) असे त्या दोन चोरट्यांची नावे आहेत. यमगरवाडी येथील रखबाई संदिपान यमगर ही वृद्ध महिला गुरुवारी सकाळी शेतीच्या कामानिमित्त घेरडी तलाठी कार्यालयात आल्या होत्या. दु. १२.३० वा. काम संपवून सांगोला-नराळे बसने घराकडे निघाल्या होत्या. बस यमगरवाडी स्थानकावर आल्यानंतर त्या एकट्याच बसमधून उतरुन घराकडे पायी चालल्या होत्या. दरम्यान, अचानक (क्र. एम. एच. १०/ ए. जे. ९७१) पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी रमेश चौगुले यांचा पत्ता विचारण्याचा बहाणा करीत वृद्ध महिलेस रोखले. चाकूचा धाक धाकविण्याबरोबरच तिला जखमी करून तिच्या गळ्यातील बोरमाळ घेऊन पोबारा केला. यादरम्यान पारे गावाकडून दुचाकीवरुन डॉ. उमाजी हणुमंत पुकळे हे घेरडीकडे येत असताना वृद्ध महिला आरडाओरड करीत दुचाकीच्या पाठीमागे धावत असल्याचे पाहिले. डॉ. पुकळे यांनी दुचाकी थांबवून त्या महिलेस काय झाले आहे, असे विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीसह दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रखबाई संदिपान यमगर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे. तपास पो. नि. दयानंद गावडे करीत आहेत.
---------------------
असे पकडले चोरट्यांना ४डॉ. पुकळे यांनी समयसूचकता दाखवत जत रोडवरुन दुचाकीचा ४ कि. मी. पाठलाग केला. पारे तलावाजवळील धोकादायक वळणावर चोरट्यांची दुचाकी घसरल्याने वेग कमी झाला. यावेळी डॉ. पुकळे यांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने दोन्ही चोरट्यांना जेरबंद केले.