डॉक्टरांची दिवाळी... अन् जीवन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:15 PM2018-12-26T13:15:57+5:302018-12-26T13:16:46+5:30
दिवाळी जसजशी जवळ यायला सुरुवात होते तशी आम्हा डॉक्टरांच्या ओपीडीत गर्दी वाढायला सुरुवात होते. दिवाळीच्या सुट्टीत डॉक्टर भेटणार नाहीत ...
दिवाळी जसजशी जवळ यायला सुरुवात होते तशी आम्हा डॉक्टरांच्या ओपीडीत गर्दी वाढायला सुरुवात होते. दिवाळीच्या सुट्टीत डॉक्टर भेटणार नाहीत म्हणून घाबरून दिवाळीपूर्वी बरेच रुग्ण अपॉर्इंटमेंट्स घेतात. दिवाळीच्या सुट्टीत लांबच्या प्रवासास जाणारे प्रवासात काही त्रास होऊ नये म्हणून अॅडव्हान्समध्ये उपचार घेण्यास येतात.
फॉरेन टूरला जाणारे तर भंडावून सोडतात. पुण्याहून आय.टी.त काम करणारा मुलगा किंवा मुलगी सोलापूरला आले की, अनेक दिवसांची पेंडिंग पडलेली सर्जरी पटकन उरकून घ्यावी म्हणूनही रुग्ण आम्हा सर्जनकडे गर्दी करतात. शाळेला सुट्ट्या पडल्या म्हणून सर्जरी करून घेणारे शिक्षक, लहान मुलांचे आईबाप हे नेहमीचेच. या सगळ्यांचा आग्रहही एकच असतो, तो म्हणजे सर्जरी दिवाळीत नको, त्यानंतर पहिल्या दिवशी करा, म्हणजे त्यांना दिवाळी साजरी करता येईल आणि नंतरच्या काही दिवसांच्या सुट्टीमध्ये आॅपरेशन करून पुन्हा वेळेत कामावर रुजू होता येईल.
दिवाळीच्या काही दिवस आधी सुट्टी मिळणाºयांना घाई असते ती पटकन सर्जरी करून त्यानंतर दिवाळी साजरी करण्याची. अंजली माझी पत्नी, जी गायनॅकॉलॉजिस्ट आहे, तिच्या ओपीडीमध्ये मात्र जरा वेगळा कार्यक्रम चालू असतो. सीझरच करायचे ठरलेले आहे तर निदान लक्ष्मीपूजन किंवा पाडव्याच्या दिवशी मुहूर्तावर करा, असा आग्रह धरणारे रुग्ण व त्यांचे आई-वडील आणि सासू-सासºयांची गर्दी असते. एकूणच सगळा गोंधळ असतो. खरे तर रुग्ण किंवा नातेवाईकांच्या दृष्टीने हे सारे बरोबर आहे. पण यात डॉक्टरांचा कोणीच विचार करीत नाही. डॉक्टरही माणूस आहे, त्यालाही कुटुंब आहे, त्यांनाही दिवाळी साजरी करायची असते, त्यांनाही दिवाळीच्या सुट्टीला जोडून मिळणारी सुट्टी कुठे तरी परगावी जाऊन एन्जॉय करायची असते, याचे भान कोणत्याही रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकाला नसते.
उलट डॉक्टरांच्या जवळिकीचा फायदा घेऊन किंवा त्यांच्यावर दबाव आणून डॉक्टरांनी सुट्टीसाठी केलेले बुकिंग कॅन्सल कसे करता येईल, असा प्रयत्नही काही रुग्ण करतात. डॉक्टर, तुम्हाला काय हो, रोजच दिवाळी असे म्हणणारे महाभागही भेटतात. खूप राग येतो अशा रुग्णांचा, परंतु डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवूनच अशा नमुन्यांशी निपटावे लागते. या वर्षीच्या दिवाळीतला किस्सा मात्र अगदी सांगण्यासारखा आहे. माझ्या एका जवळच्या मित्राचे काका दिवाळीपूर्वी एक दिवस माझ्याकडे तपासण्यासाठी आले. उच्चशिक्षित आॅफिसर असलेली ही व्यक्ती. पर्सनॅलिटी तशी ग्रॅण्ड, आवाजात एकप्रकारचा रुबाब. एका वर्षापूर्वी त्यांना गंभीर आजाराचे निदान झालेले.
श्रीमंत असल्याने परदेशी जाऊन त्यावरचे सर्व उपचार पूर्ण करून नुकतेच ते पुन्हा सोलापुरात राहावयास परत आले होते. त्यांची डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर मला असे लक्षात आले की दोन दिवसांपूर्वी यांनी सोलापुरात एका अशिक्षित माणसाकडून आपली पाठ तुडवून घेतली होती. कशासाठी तर ती व्यक्ती पायाने काही ठराविक पॉइंट्सवर दाब देऊन अॅक्युपंक्चर करीत होती म्हणे, तेही त्यांचा गंभीर आजार बरा करण्यासाठी. ही स्टोरी ऐकल्यानंतर मला हसावे का रडावे हेच कळेनासे झाले. असो. हा रुग्ण माझ्याकडे आला होता तो बद्धकोष्ठतेची किंवा कॉन्स्टिपेशनची तक्रार घेऊन. जवळच्या मित्राचे काका असल्याने त्यांच्याकडे माझा मोबाईल नंबर तर होताच. सर्वप्रथम मोबाईलवरूनच त्यांना काही उपचार करता येतील का, याची विचारणा त्यांनी केली. मी शांतपणे तपासल्याशिवाय उपचार करता येणार नाही, असे सांगितल्यानंतर मग त्यांनी माझी अपॉर्इंटमेंट घेतली.
दिलेल्या अपॉर्इंटमेंटच्या वेळेच्या आधी पंधरा मिनिटे फोन करून त्यांनी मी माझ्या हॉस्पिटलमध्ये जागेवर आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घेतली, तीही माझ्या मोबाईलवरच. ओपीडीत त्यांचे रिसेप्शनमध्ये आगमन झाल्याची वार्ताही त्यांनी मला मोबाईलवर दिली.
जवळच्या मित्राचे काका असल्याने अर्थातच ओपीडी पेपर काढणे किंवा कन्सल्टिंग फी देणे याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या आधी नंबर लावून आत आलेल्या पेशंटसाठी थोडासा जास्त वेळ मला लागतो आहे, हे पाहिल्यानंतर त्यांनी रिसेप्शनिस्टकडे लवकर आत सोडण्याचा तगादा लावला. स्वत: आत आल्यानंतर मात्र मला माहीत असलेली आणि त्यांच्याकडच्या कागदपत्रावरून समजणारी हिस्ट्री त्यांनी जवळजवळ पंधरा मिनिटे मला ऐकवली. त्यांचे जवळचे मित्र आणि सर्जन सध्या सोलापुरात नसल्याने त्यांनी माझ्याकडे येण्याची कृपा केली, हेही त्यांनी मला ऐकविले. मी त्यांना तपासले आणि योग्य त्या उपचाराचे प्रिस्किप्शन लिहून दिले. काय खायचे, काय नाही खायचे, पथ्ये कोणती पाळायची, गोळ्या कशा घ्यायच्या असे अनेक प्रश्न विचारून त्यांनी मला भंडावून सोडले. (क्रमश:)
- डॉ. सचिन जम्मा
लॅप्रोस्कोपिक सर्जन, सोलापूर