डॉक्टरकडून नर्सवर रूग्णालयातच अत्याचार; नर्सचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 02:27 PM2020-06-19T14:27:59+5:302020-06-19T14:30:48+5:30
मंगळवेढ्यातील घटना; पिडित महिलेनी दिली तक्रार, डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
मंगळवेढा : एका २७ वर्षीय नर्सवर अत्याचार केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. दरम्यान, पीडित महिलेने गुरुवारी सकाळी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन जाळून घेण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. प्रशांत प्रभाकर नकाते असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित नर्सला एक वर्षापूर्वी डॉक्टरने तू मला खूप आवडतेस, मी तुइयावर प्रेम करतो, माझे लग्न झाले आहे. मी तुला आयुष्यभर सांभाळतो, असे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले. ५ जून २०१९ ते २६ एप्रिल २०२० पर्यंत त्याने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवल्याचे दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे.
याबाबत पीडिता पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी दोनवेळा गेली होती; मात्र चक्कर येत असल्याने पूर्ण तक्रार न देता परत आली. आई व भावाने तक्रार दिल्यास बदनामी होईल, असे सांगितल्याने तक्रार दिली गेली नाही. गुरुवारी ( १८ जून) रोजी सकाळी ११ वाजता पीडिता डॉक्टरला भेटण्यासाठी गेली होती. तिच्यावर अन्याय झाल्याची खंत असल्याने तिने सोबत पेट्रोल नेले होते. तेथेच तिने अंगावर ओतून पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकाराने डॉक्टर व दवाखान्यातील अन्य मंडळींनी अंगावर पाणी टाकून विझवले.
गंभीर भाजलेल्या स्थितीत पोलिसांनी तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, वेळोवेळी पीडितेवर अत्याचार केल्याने तिला दिवस गेले होते. आरोपीने जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात केला आहे. कोणास काही सांगितल्यास तुला व तुइया घरातील लोकांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे करीत आहेत.