डॉक्टरांनाही घाम फुटला; दंश केलेला साप घेऊनच ‘ती’ चक्क रुग्णालयात अवतरली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:57 AM2020-02-29T11:57:08+5:302020-02-29T12:02:18+5:30
बीबीदारफळमधील महिला शिंदेंचा धाडसी प्रयत्न; रात्रीच्या सुमारास पाणी देताना घडली घटना
अरुण बारसकर
सोलापूर: रात्रीच वीज सुरू होणार अन् पिकांना पाणी द्यावे लागणार म्हणून मोबाईलच्या उजेडात दार फोडले... बहिणीचा मोबाईल आल्याने बोलणे सुरू असताना पायाला सापाने दंश केला़़. काहीतरी चावल्याची त्यांना जाणीव झाली... मोबाईल बंद केला अन् बघते तर काय साप... मग काय?...त्यांनी धाडसाने साप धरला अन् सोबत घेऊन चक्क शासकीय रुग्णालयात अवतरल्या... हे पाहून डॉक्टरांनाही घाम फुटला... मात्र, त्यांना औषधोपचार करणे सोयीचे झाले.
त्या वाचलेल्या धाडसी महिलेचे नाव आहे बालिका अशोक शिंदे. तीन दिवसांपूर्वी बीबीदारफळ शिवारात ही घटना घडली. वीज पुरवठा कधी सुरू होणार अन् कधी बंद होणार हे सांगता येत नाही़ मात्र वीज सुरू झाल्यानंतर विद्युत मोटार सुरू करून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. अशाच स्थितीत बीबीदारफळ येथील बालिका अशोक शिंदे (वय ४०) या महिला रात्री ९ वाजता वीज येणार असल्याने तिने पिकाला पाणी देण्यासाठी दार फोडले. इतक्यात बहिणीचा फोन आला अन् त्यांनी मोबाईल उचलला़ त्या बोलू लागल्या. यावेळी कांदा पिकात लपलेल्या सापाने पायाला दंश केला. आपल्याला काहीतरी चावले आहे, याची जाणीव झाली अन् त्यांनी खाली पाहिले तर चक्क साप.
सापाने दंश केल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या सापाला धाडसाने धरले़ त्याला सोबत घेतले. गावात उपचार करण्याचा प्रयत्न केला़ मात्र साप चावल्याने शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला मिळाला. त्यांनी थेट सोलापूर शासकीय रुग्णालय गाठले. सोबत आणलेला साप पाहून डॉक्टरांनाही घाम फुटला. त्या सापाची पाहणी करून डॉक्टरांनी लागलीच त्यांच्यावर उपचार सुरू केले.
बालिका शिंदे यांनी सोबत साप आणल्याने डॉक्टरांना उपचार करणे सोयीचे झाले व प्राणही वाचले. हा साप घोणस असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी साप विषारी असल्याचे किमान पाच दिवस उपचारासाठी थांबावे लागेल, असे त्यांना सांगितले होते. न घाबरता त्यांनी उपचाराला साथ दिली आणि त्यांचे प्राण वाचले.
सलग तीन महिने रात्रीच वीज येते
- बीबीदारफळ गावासाठी अकोलेकाटी व बीबीदारफळ उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. दोन्ही उपकेंद्रांतून डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी असे सलग तीन महिने शेतीपंपासाठी रात्रीच वीज पुरवठा केला जात आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा तसेच अन्य पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचे जागरण करावे लागते. ऐन रब्बी पिकांचा कालावधी असताना एकाच गावाला सलग तीन महिने रात्रीचा वीज पुरवठा सुरू आहे.
मागील वर्षी पाणी नसल्याने पिके घेता आली नाहीत. यावर्षी पाणी आहे, मात्र वीज रात्री ८ ते सकाळी ६ वाजेदरम्यान असते. थंडी व अंधार असला तरी पिकांना पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही. एकाच गावाला सलग तीन महिने रात्रीच वीज देण्याचे नियोजन कसले?
- शिवाजी पाटील, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त समिती