सोलापुरातील डॉक्टरांना मिळणार एक हजार खोल्यांचा नवीन वसतिगृह
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 20, 2023 09:19 PM2023-01-20T21:19:53+5:302023-01-20T21:19:59+5:30
अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची माहिती:
सोलापूर : डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा डॉ. सुधीर देशमुख यांनी नुकताच पदभार घेतला असून महाविद्यालयातील भावी डॉक्टरांसाठी अर्थात विद्यार्थ्यांसाठी एक हजार खोल्यांचा नवीन वसतिगृह बांधण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवू, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वसतिगृहात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नी निवासी विद्यार्थी संघटनेने वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. नवीन वसतिगृहची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून काम बंद आंदोलन झाले. नवीन वसतिगृह मागणीवर महाजन यांनी सकारात्मकता दर्शवल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात नवीन अधिष्ठाता रुजू झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे नवीन वसतिगृहाची मागणी केली असून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार नवीन वसतिगृहासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.