माळकवठे येथील डॉक्टरांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:52+5:302021-05-08T04:22:52+5:30
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई आणि तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर गायकवाड हे माळकवठे येथे कोरोना नियंत्रण बैठकीसाठी गेले ...
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई आणि तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर गायकवाड हे माळकवठे येथे कोरोना नियंत्रण बैठकीसाठी गेले होते. बैठकीत ग्रामस्थ सूचना मांडत होते. याच दरम्यान एक बोगस डॉक्टर आपले घोडे पुढे दामटत होता. अधूनमधून तो सूचनांचा भडिमार करत होता. यावर गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्या भुवया उंचावल्या. त्याने या इसमाची ओळख समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा इसम माळकवठे गावात वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात आले.
हसनसाब मुजावर हा गेल्या पंधरा वर्षांपासून गावात वैद्यकीय व्यवसाय करत आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी उत्सुकतेपोटी त्याचे क्लिनिक तपासण्याची इच्छा व्यक्त केली. क्लिनिकमध्ये औषधे, इंजेक्शन्स, पीपीइ कीट आदी साहित्य आढळून आले. वैद्यकीय पदवीची विचारणा केली असता डॉक्टरांची बोबडीच वळली. थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तगादा लावल्याने नॅचरोपॅथी पदविका प्रमाणपत्र दाखविण्यात आले. अशा प्रमाणपत्रधारकांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येत नाही याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. याच पद्धतीने गावातील विश्वनाथ अळलीमोरे यांच्याही बाबतीत तोच प्रकार घडला.
गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी या दोन्ही डॉक्टरांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-------
बोगस डॉक्टरांचे घूमजाव
तालुक्यात बहुतेक सर्वच गावांत बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. गुरुवारी गटविकास अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये झळकताच तालुक्यातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले. शुक्रवारी दिवसभरात एकानेही दवाखाना उघडला नाही.
----