११ दिवसांच्या तपासात जप्त केली गायब फायलीतील कागदपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:23 AM2021-07-28T04:23:35+5:302021-07-28T04:23:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मोहोळ : शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून मोहोळमध्ये दोघांचा खून केल्या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी ११ दिवसांत काही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोळ : शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून मोहोळमध्ये दोघांचा खून केल्या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी ११ दिवसांत काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच टेम्पोचालक भय्या असवले याला तीन वेळा मिळालेली ११ दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी संपली. २७ जुलै रोजी त्याला सोलापूर विशेष न्यायालयाने ९ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार १४ जुलै रोजी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे, रमेश ऊर्फ गोटू सरवदे यांच्यासह चालक भय्या असवले अशा सहा जणांनी कट रचून येथील शिवसैनिक सतीश क्षीरसागर व विजय सरवदे यांच्या अंगावर टेम्पो घालून दोघांचा खून केला. याप्रकरणी सहा जनांवर मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात टेम्पो चालक भय्या असवले याला १५ जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्रारंभी १५ ते २३ जुलै अशी ७ दिवसांची नंतर २३ ते २६ जुलै तीन दिवस व २६ ते २७ जुलै एक दिवस अशा पद्धतीने तीन वेळा एकूण ११ दिवस पोलीस कोठडी सुनावली होती.
या ११ दिवसांच्या तपासात मात्र पोलीस प्रशासनाने रमाई घरकुल आवास योजनेच्या गायब फायली संदर्भातील कागदपत्रे व बोगस मतदार नोंदणी संदर्भातील कागदपत्रे मिळविली आहेत.
या गुन्ह्यातील प्रमुख एकही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. दरम्यान २६ जुलै रोजी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह पीडित परिवाराच्या नातेवाइकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. यावेळी सर्व रेकॉर्ड तपासून दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासन स्वत:ची भूमिका पार पाडेल. यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात पोलीस कमी पडणार नसल्याची ग्वाही पोलीस अधीक्षकांनी शिष्टमंडळाला दिली.
या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे करीत आहेत.
-----
आम्हाला संरक्षण द्या...
माझा एकुलता एक मुलगा गेला. आता घरात त्याची दोन लहान मुले व सुनबाई राहतो. आम्हाला संरक्षण द्या. या घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करावी, अशी मागणी मयत विजय सरवदे यांच्या आईने पोलिसांकडे केली. उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी मंगळवारी मयत शिवसैनिक सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोघांच्या घरी जाऊन नातेवाइकांचे सांत्वन करीत संरक्षणार्थ पोलीस पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यावेळी सेनेचे माजी तालुकाप्रमुख काकासाहेब देशमुख, सेनेचे नागेश वनकळसे, अशोक गायकवाड उपस्थित होते.
------
२७ मोहोळ
सतीश क्षीरसागर कुटुंबाची चौकशी करताना मयत शिवसैनिक उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रभाकर शिंदे.