केल्याने देशाटन, मनुजा येते शहाणपण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 08:12 PM2019-09-28T20:12:23+5:302019-09-28T20:12:31+5:30

जागतिक पर्यटन आणि देशांतर्गत पर्यटन नक्कीच वाढलेले आहे.

By doing this, man comes wisdom! | केल्याने देशाटन, मनुजा येते शहाणपण !

केल्याने देशाटन, मनुजा येते शहाणपण !

Next

ही म्हण प्रचलित आहे आणि ती खरीच आहे. निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालवणे, नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेणे ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्तीच पर्यटनाचा मूळ आधार आहे. प्राचीन भारताचा इतिहास पाहता ‘फाहियान’ आणि ‘युआन शॉन’ हे भारतात आलेले दोन चिनी प्रवासी जगप्रसिद्ध आहेत. कोलंबसने लावलेला अमेरिकेचा शोध, वास्को-द -गामाचे भारतातील आगमन ही पर्यटनाची उदाहरणे सर्वश्रुत आहेत. पर्यटनाचे हे महत्त्व ओळखूनच १९८० पासून २७ सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक पर्यटन विभागाने ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले. ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे १९७० साली ‘यूएनडब्लूटीओ’ने परिनियम स्वीकारले. परिनियम स्वीकारणे ही जागतिक पर्यटनातील प्रगतिदर्शक घटना समजली जाते. या दिनाचा उद्देश पर्यटन हे क्षेत्र आंतरराष्ट्रीय समुदायात वठवत असलेल्या भूमिकेची तसेच जगभरातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्यांवर पडणाºया प्रभावाची जागरुकता निर्माण व्हावी, हा होता.

 २०१७ मध्ये या दिवसाची सूत्रयोजना ‘शाश्वत पर्यटन’ होती. २०१८ मध्ये ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन’ ही सूत्रयोजना होती. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेत या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त व्हावे, यासाठी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाला ‘शाश्वत पर्यटन विकासाचे साधन’ असे घोषवाक्य निश्चित केले आहे. पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाºया नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो.

पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक, मनोरंजन, माहिती आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील स्थानिक उत्पादनांना देखील मागणी निर्माण होते. सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकांना जोडण्याचे काम होते. पर्यायाने त्या भागातील अर्थकारणाला देखील गती प्राप्त होते. पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्याकडे जितके लक्ष दिले जाते तितके लक्ष त्या भागातील खाद्यसंस्कृती, पारंपरिक कला, साहित्य, लोकजीवन, लोकपरंपरा, निसर्ग यांचा विचार केला जात नाही. या सर्व स्थानिक बाबींचा विचार करून त्याचे योग्य मार्के टिंग झाले पाहिजे, स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे. महागड्या पंचतारांकित उपाहारगृहातील वास्तव्यापेक्षा पर्यटनस्थळी घरगुती निवास, भोजन अशी सर्वांना परवडेल, अशी सुविधा निर्माण केली पाहिजे.पाश्चत्त्य राष्ट्रांनी आपल्या पारंपरिक गोष्टींचे जतन व संगोपन केले आहे तसेच आपण देखील केले पाहिजे.

विदेशी पर्यटकांना भुरळ घालणारी आपली संस्कृती, आपल्या गौरवशाली परंपरा, आपली वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधता असलेली वेशभूषा, लोकनृत्य, खाद्यसंस्कृती याचे योग्य पद्धतीने मार्केटिंग झाले पाहिजे. विदेशी चलनाचे प्रमाण त्यामुळे वाढेल व स्थानिकांच्या रोजगाराबरोबर अर्थकारणाला देखील चालना मिळेल. अतिथी देवो भव’ ही आपल्या भारतीय संस्कृतीची वैभवशाली परंपरा आहे. त्यास अनुसरून आदरातिथ्य, विनयशीलता, प्रामाणिकपणा, नि:स्पृहता या गुणांचा पुरस्कार केला पाहिजे. त्यास अनुसरून अप्रामाणिकपणा, उद्धटपणा, अस्वच्छता अशा काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे देशाची प्रतिमा जगात मलिन होऊ शकते. दळणवळणाच्या वाढलेल्या सोयीसुविधा, उंचावलेले आर्थिक जीवनमान , ‘मागणी तसा पुरवठा’ करणाºया प्रवासकंपन्या, वेळेचा अपव्यय टाळणारी विमानसेवा यामुळे जागतिक पर्यटन आणि देशांतर्गत पर्यटन नक्कीच वाढलेले आहे.

 या साºया बाबींचा विचार पर्यटन विकासाच्या योजना आखताना केला गेला पाहिजे, त्याचप्रमाणे पायाभूत, मूलभूत सुविधा देखील निर्माण केल्या गेल्या पाहिजेत, तरच पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल आणि सर्वांना परवडणारे स्वस्तातले पर्यटन निर्माण होईल.
- वसुंधरा शर्मा
(लेखिका शिक्षिका आहेत.)

Web Title: By doing this, man comes wisdom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.