कृष्ण तलाव परिसरात देशी-विदेशी पक्ष्यांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:22 AM2021-03-31T04:22:52+5:302021-03-31T04:22:52+5:30
मंगळवेढ्यात वरचेवर भाविकांची संख्या वाढत आहे. या संतभूमीत येणारा भाविक हा वेगवेगळ्या मंदिरांना भेटी तर देतोच; परंतु या तलावावर ...
मंगळवेढ्यात वरचेवर भाविकांची संख्या वाढत आहे. या संतभूमीत येणारा भाविक हा वेगवेगळ्या मंदिरांना भेटी तर देतोच; परंतु या तलावावर निसर्गाचे अनोखे रूप पाहण्यासाठी नक्कीच जातो. निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमी नागरिकांची वर्दळ वाढतच आहे. हे एक निसर्गरम्य पर्यटन व पक्षी निरीक्षण केंद्र म्हणून उदयास येऊ शकते.
कृष्ण तलाव हा मंगळवेढ्यापासून जवळच आहे. या तलावाला स्वतःचा असा एक इतिहास आहे. २०१६ ला या तलावातील गाळ काढला व त्याची खोली वाढविली. आता याठिकाणी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता निश्चितच वाढली आहे. याच तलावाच्या काठावर वृक्षारोपण केल्याने पक्ष्यांना अधिवासासाठी सुरक्षित व नैसर्गिक ठिकाण उपलब्ध झाले आहे. या तलावाला सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट दिली आहे. तसेच रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची रोपे झाडे लावून हा परिसर निसर्गरम्य केला आहे.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तळसंगी, शिरनांदगी, खोमनाळ या परिसरात किंगफिशर, पाईड किंगफिशर, हळदीकुंकू बदक, चातक, स्थूनशील, वेडा राघू, शेलडक, वेगवेगळ्या प्रकारच्या घारी, पांढर्या भुवईची नाचण, निलकंठी, माशीमार, भांगपाडी, मैना, धनेश, ठिपकेवाला, पिंगळा, पांढर्या मानेचा करकोचा, चितूर, मुनिया, वारकरी, कवड्या परीट, हुदहुद्या असे असंख्य आकर्षक पक्षी पाहावयास मिळत असल्याचे पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार राजू रायबान यांनी सांगितले.
संतनगरीत कृष्ण तलाव नावारूपाला येईल
याठिकाणी विविध सेवा-सुविधा देत शासन व नगरपालिकेने या तलावावर थोडेफार पैसे खर्च केल्यास संतनगरीत हा कृष्ण तलाव नावारूपाला येईल. संतांबरोबर या तलावाचे पर्यटन व निसर्गरम्य पर्यटनक्षेत्र व पक्षीनिरीक्षण केंद्र म्हणून निश्चितच नावारूपाला येऊ शकते.
कोट :::::::::::::::::
मंगळवेढा येथील कृष्ण तलाव आणि ग्रामीण भागातील तलावांमध्ये विविध जातीचे पक्षी आढळून येत आहेत. येथील परिसरात असलेली विविध झाडे आणि तलावातील पाणी जतन केले पाहिजे.
- राजू रायबान
पक्षी अभ्यासक