इतनी शक्ती हमे देना दाता...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 01:01 PM2020-03-12T13:01:38+5:302020-03-12T13:01:58+5:30
आज जग पूर्णपणे अस्ताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. प्रत्येक व्यक्ती, प्राणी, वनस्पती अगदी निसर्गसुद्धा अस्थिर झाला आहे.
आज जग पूर्णपणे अस्ताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. प्रत्येक व्यक्ती, प्राणी, वनस्पती अगदी निसर्गसुद्धा अस्थिर झाला आहे. अशा परिस्थितीत देवाची कृपा लाभावी, असे वाटत आहे. आज व्यक्ती मानसिक व शारीरिकदृष्ट्या संघर्ष करीत आहे. देवाची जणू गरज येथे आहे. हे कलियुग सुरू झाल्यापासून मनुष्याच्या आयुष्यात उलथापालथ सुरू झाली आहे.
आलेख दु:खाकडे वळताना दिसत आहे. अशा परिस्थितीत दैव साथ देईल का? हा प्रश्न उभा राहतो. जागतिक मंदीमुळे काहींच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पोट भरणे हा एक संघर्ष प्रवास असून, तो अनेक जण अनुभवत आहेत़ त्याला लोकांची साथ मिळत नाही़ पोटापाण्यासाठी वणवण भटकावे लागते़ तेव्हा कुठे कष्टाचा घास मिळतो आहे. समाज हा चांगलाच असतो; पण परिस्थिती, वाईट वेळ सांगून येत नाही़ ते विधिलिखित असते. तरुण-तरुणी संघर्ष करतात, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असते़ समोरील आव्हानांवर ते सहजपणे मात करू शकतात़ परंतु त्यावर मात करता न आल्यास निराशा घातक ठरू शकते. पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. धगधगीच्या जीवनात पैसा आणि कुटुंब यातील समतोल बिघडत चाललेला दिसतो. देवा इतकी शक्ती द्यावी की तरुण प्रत्येक अंतर सहज पार करतील व आयुष्यात सुखी होतील.
मोबाईल फोनमधून बाहेर येऊन जग दाखविले पाहिजे़ मित्र- मैत्रिणी, आवडत्या गोष्टी केल्या पाहिजेत़ हे जग गुन्हेगारीकडे वळत चाललेले आहे. परंतु परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी समाजाने सामाजिक जबाबदारी उचलली पाहिजे. समाजाने नकारात्मक गोष्टी सोडून सकारात्मक विचार आत्मसात केले पाहिजे. कोणालाही त्रास होऊ नये असे कार्य करत आपले उद्देश गाठावे. देवाने सर्वांना काही उद्देशाने पृथ्वीतलावर पाठविले आहे़ काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात.. सर्वांनी अनुभव घ्यावा, मित्र-मैत्रिणींबरोबर चांगल्या गप्पा माराव्यात, मोबाईलचा वापर कमी करत व्यक्ती माणूस ओळखायला शिकावे. निसर्गावर प्रेम करावे, प्राणिमात्रांवर दया करावी़ प्राण्यांना मारणे, त्रास देणे थांबवावे़ निसर्गाशी समतोल साधावा.
प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावावे़ प्रवासाला जावे, आवडत्या ठिकाणी वेळ घालवावा़ संगीत ऐकावे़ तेही मनाला उत्तेजन देते़ छान प्रवास किंवा गाडीने चक्कर मारावी. पुस्तके वाचावीत़ मनुष्याला आयुष्यातील उतार-चढाव अनुभव देतात. त्यातून एखादा बोध मिळतो. देवाने चांगल्या गोष्टी दिल्या आहेत़ हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे़ अनेक अडचणी असतात़ लोक प्रांत,भाषा ,जात ,धर्म ,देश यामुळे विखुरलेले आहेत़ परंतु त्यातसुद्धा देवाने सांगितलेला मार्ग सोडता कामा नये. देवा आम्हाला इतकी शक्ती दे की, प्रत्येक अडचण दूर होऊन एक चांगला समाज, देश, प्रांत आणि हे जग सुखी होईल. गुन्हेगारी समाजातील नकारात्मक भावना, द्वेष प्रत्येक गोष्टीचा त्रास देते, ती कमी व्हावी. देवा मला माहीत आहे.. सुख-दु:ख हे चालूच राहणाऱ पण आम्हाला इतकी शक्ती दे, हे मन इतके प्रबळ बनव व तुझा हात आमच्या पाठीशी ठेव़ जेणेकरून सर्व पृथ्वीतलावरील जीव सुखअवस्था अनुभवतील. देवा तुझ्या हातात आमचे भविष्य आहे़ ते तू सुखकर मार्गाने व्यथित व्हावे हीच इच्छा !
- ऋत्विज चव्हाण
(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत़)