घाबरू नका.. अनगर परिसरात बिबट्या नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:08+5:302021-01-08T05:11:08+5:30
शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान अंकुश कोरवले यांच्या शेतात त्यांचे वाटेकरी अरुण माळी उसाला पाणी देत असताना बांधावरून शेजारच्या ...
शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान अंकुश कोरवले यांच्या शेतात त्यांचे वाटेकरी अरुण माळी उसाला पाणी देत असताना बांधावरून शेजारच्या अविंदा मोरे आपल्या घराकडे निघाल्या होत्या. उसातून आलेला लाल रंगाचा जंगली प्राणी त्यांच्या अंगावर धावून आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्याप्रसंगी अरुण माळी यांनी प्राण्याच्या तोंडावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकला तरीही तो प्राणी तेथेच उभा राहिला तेव्हा त्यांनी त्यास दगड मारून हुसकावून लावल्याने तो प्राणी डॉ. गणेशप्रसाद गुंड यांच्या तोडलेल्या उसातून निघून गेल्याचे अरुण माळी यांनी पाहिल्याचे सांगितले.
दुसऱ्या दिवशी दुपारी पांडुरंग राशीनकर यांनीही त्याला पाहिल्याचे सांगितले. तोपर्यंत त्या परिसरासह अनगरमध्ये बिबट्या आल्याचे वृत्त पसरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नागरिकांनी रात्र जागून काढली.
सोमवारी माजी आमदार राजन पाटील यांनी तहसीलदार जीवन बनसोडे, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार वनरक्षक सागर जवळगी, बापू वाघमोडे, नागनाथ गवळी यांनी या परिसराला भेट देऊन परिसर पिंजून काढला असता त्यांना बिबट्याचे ठसे कुठेही आढळले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
---
अनगरच्या परिसरात बिबट्यास राहण्यास नैसर्गिक अधिवास नाही. त्याच्या पायाचे ठसे कुठेही दिसून आले नाहीत. त्याने कोणावरही हल्ला केल्याची तक्रार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता रात्री एकट्याने न फिरता स्वतःची व जनावरांची काळजी घ्यावी.
- सागर जवळगी, वनरक्षक, वनविभाग, मोहोळ