रुग्णांच्या जिवाशी खेळून सीमावाद निर्माण करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:07+5:302021-04-22T04:22:07+5:30
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांचे नातेवाईक सध्या अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. माढा तालुक्यातील कुर्डुवाडी व टेंभुर्णी येथे उपलब्ध ...
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांचे नातेवाईक सध्या अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. माढा तालुक्यातील कुर्डुवाडी व टेंभुर्णी येथे उपलब्ध चार डेडिकेटेड कोविड सेंटर ही फुल्ल झालेली आहेत. त्यामुळे येथील रेग्युलर व काही बाधित रुग्ण बार्शी, अकलूज व सोलापूरच्या उपलब्ध मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत आहेत. नुकतेच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या असहकार्यामुळे रुग्णांना बार्शीत उपचारासाठी ॲडमिट करून घ्यायचे का? याचा विचार करावा लागेल, असा इशारा दिला. त्यावर येथील सर्व सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली. येथील काही संघटनांनी याबाबत लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे तीव्र शब्दांत नाराजीदेखील व्यक्त केलीली आहे.
सध्याच्या काळात कोणत्याच तालुक्याने आरोग्याच्या प्रश्नांबाबत सीमा वाद उपस्थित करून रुग्णांच्या जिवाशी खेळू नये, अशीही मागणी येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे.
बार्शीला तालुक्याला कर्मवीर जगदाळेमामांचा महान वारसा आहे. त्यांनीदेखील कधीच कोणत्याच कारणाने कधीच प्रांतवाद केलेला नाही. आमदार राऊत यांची भूमिका चुकीची असल्याचे म्हटले आहे. उलट त्यांनी शेजारच्या सर्व तालुक्याला मदतीचा हात दिला पाहिजे, असे येथील संभाजी ब्रिगेडचे हर्षल बागल व मनसेचे आकाश लांडे यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या या महामारीत अनेक लोक हे मदतीचा हात पुढे करत आहेत. आमदार राऊत यांचा इशारा चुकीचा असून, याबाबत त्यांना वरिष्ठांनी समज द्यावी, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दूरध्वनीद्वारे सांगितले आहे. बार्शी तालुक्यातील पण शेवटच्या टप्प्यात उपचार घेत असलेले काही रुग्ण हे पुणे, मुबंई, सोलापूर, उस्मानाबाद अशा ठिकाणी जात असतात हेही त्यांनी विसरू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
----
सोशल मीडियावरून समाचार
बार्शीत उपचारास विचार करावा लागेल या स्टेटमेंटबद्दल माढा तालुक्यातील अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवरून नागरिकांनी कडक शब्दांत समाचार घेतलेला आहे. यानिमित्ताने मात्र पुन्हा एकदा माढ्यात मल्टिस्टेट हॉस्पिटल उभे करावे. सर्व आरोग्य सुविधा द्यायला हव्यात ही सर्वसामान्य माणसाची अनेक दिवसांपासूनची मागणी पुढे आली आहे.
------
..................