काहीही झालं तरी नियमाचं अनलॉकिंग नकोच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 01:02 PM2020-06-20T13:02:57+5:302020-06-20T13:03:10+5:30

‘काहीही झालं तरी मी नियम पाळत राहणार....’ अशी भीष्म प्रतिज्ञा करण्याची ही वेळ आहे. सध्याच्या ‘अनलॉकिंग’ परिस्थितीमध्ये आणखी जास्त काळजी घेणे अनिवार्य आहे.

Don't deny unlocking the rules ...! | काहीही झालं तरी नियमाचं अनलॉकिंग नकोच...!

काहीही झालं तरी नियमाचं अनलॉकिंग नकोच...!

googlenewsNext

मार्चचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे महिन्यातील असे एकूण जवळपास सत्तर दिवस आपण कोविड-१९ मुळे लॉकडाऊनमध्ये होतो. हा संपूर्ण प्रकारच अतिशय अनपेक्षित असा होता. आपण सारेजण गेल्या अनेक दशकांपासून आपल्याच ‘तालात’ जीवनाचं हे गाणं गात असतानाच टोळधाडीप्रमाणं कोरोना विषाणूंचा हल्ला चोहोबाजूंनी झाला आणि पुन्हा एकदा ही पृथ्वी फक्त माणूस नावाच्या प्राण्यासाठीच नाही हे सिद्ध झाले. 

मुळात हा विषाणू एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे राक्षसाप्रमाणे पसरतो. यासाठी काही नियम समोर आले आणि या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक बनून गेलं. ‘सरकारी नियम’ म्हणून आपण सारेजण हे नियम काटेकोरपणे पाळले. तरीसुद्धा ग्रीन ते आॅरेंज आणि तिथून लगेच ‘रेड झोन’ मध्ये आपण अवतरलो. दिवसागणिक ‘ब्रेकिंग’, ‘धक्कादायक’ अशा कोरोनाबाधितांच्या बातम्या निमूटपणे आपण ऐकत आणि वाचत राहिलो.... ही शृंखला आणखी सुरूच आहे. 

सगळं बंद राहून नक्कीच चालणार नाही. लहान-मोठे उद्योग, दुकाने हे जीवनचक्र सुरू ठेवावंच लागणार असल्यामुळे  जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यानुसार अंमलबजावणीचीही सुरुवात झाली. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे भोंगे वाजायला लागले. 

कामाला जायची लगबग आणि वेगवेगळ्या कारखान्यातून यंत्रांची धडधड सुरू झाली. मानवाच्या गतिमान जीवनमानाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. खरोखरच ही एक चांगली सुरुवात म्हणायला हवी. या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र नियमांचं पालन आवश्यकच आहे कारण अजूनही नियमांचं अनलॉकिंग झालेलं नाही. कोरोना विषाणूंचं अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आलेलं नाही. आणखी बरेच दिवस पाळायला अतिशय सोपे असलेले हे नियम आपल्याला काटेकोरपणे पाळायचे आहेत. आजूबाजूला सारं  काही सुरू होणं म्हणजे ‘आपण आता सुटलो, कोरोना नाहीसा झाला’ ...असं वाटत राहणं साहजिक आहे, परंतु हे खरं नाही. ‘काहीही झालं तरी मी नियम पाळत राहणार....’ अशी भीष्म प्रतिज्ञा करण्याची ही वेळ आहे. सध्याच्या ‘अनलॉकिंग’ परिस्थितीमध्ये आणखी जास्त काळजी घेणे अनिवार्य आहे, हे सुजाण नागरिकांना सांगण्याची गरज नाही परंतु आज काही ठिकाणी जे चित्र दिसते त्यावरून ‘जन प्रबोधनाची’ गरज असल्याचे लक्षात येते म्हणून हा लेखन प्रपंच ! 

रस्त्यावरून जाताना मास्क न वापरणे, बेफिकीरपणे कुठेही थुंकणे, कोणत्याही वस्तूला अकारण स्पर्श करणे, जमावाने फिरणे, गर्दी करणे या आणि अशा तत्सम गोष्टी बंद करणं आवश्यक आहे. बरं या गोष्टी दिसल्यानंतर ‘आॅन द स्पॉट’ सांगत राहणं तितकंच गरजेचं आहे.  या नियमांना ‘सरकारी नियम’ पेक्षा ‘माझे नियम’ समजून पाळले गेले तर नियमांची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे नक्कीच होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमांचं पालन हे १०० टक्के होणं अपेक्षित आहे कारण इथे चुकीला माफी नाही आणि नियम न पाळण्याच्या चुकीमुळे होणारे नुकसान खूप मोठे आहे. 
इतके दिवस सुरक्षित असलेल्या ग्रामीण भागातली परिस्थिती आता बदलते आहे. काही दिवसांसाठी शहरी भागाचा संपर्क कटाक्षाने टाळला जावा. ग्रामीण आणि शहरी भागातले दळणवळण आणखी काही दिवसांसाठी संपूर्णपणे बंद ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता प्रत्येकजण कोरोनाशी लढणारा एक ‘योद्धा’ आहे. नियमांचं पालन करणारी प्रत्येक व्यक्ती अभिनंदनास आणि  पुरस्कार देण्यास पात्र आहे. याठिकाणी ‘स्वत:ची काळजी घेणे’ म्हणजेच ‘समाजाची आणि देशाची काळजी घेण्यासारखे’ आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमांचं पालन करणारी प्रत्येक व्यक्ती ‘वंदनीय’ आहे, हेच खरे ! स्वत:साठी, आपल्या कुटुंबीयांसाठी, आपल्या देशासाठी नियम पाळूया?...! धन्यवाद !
- अरविंद म्हेत्रे
(लेखक ‘निसर्ग माझा सखा’चे  समन्वयक आहेत.)

Web Title: Don't deny unlocking the rules ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.