थंडी वाढली म्हणून मद्यपान करू नका अन्यथा हृदयविकाराचा झटका आलाच म्हणून समजा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 03:10 PM2021-12-06T15:10:47+5:302021-12-06T15:10:53+5:30
हायपोथर्मियाची शक्यता : रक्तातील साखरेची पातळी तपासा
सोलापूर : थंडी सुरू झाली की, मद्यपानाचे नियोजन अनेक जण करतात. थंडी आणि मद्य हे अनेकांसाठी एक समीकरणच आहे. थंडीच्या दिवसात मद्यपान केल्यास शरीर गरम राहते, असा लोकांमध्ये समज आहे; पण खरंच थंडीत दारू पिणे योग्य आहे का? दारू प्यायल्यामुळे शरीराचे तापमान वाढते का? थंडीपासून बचाव होतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या वेळी मद्यपान केल्याने शरीरात गरमी जाणवते; पण असे केल्याने तुमच्या शरीराचे तापमान कमी होते. आरोग्य विज्ञानाने याबाबत सखोल संशोधन केले आहे. त्यानुसार मद्यपान केल्याने शरीराचे कोअर तापमान कमी होते आणि हायपोथर्मियाचा धोका वाढतो.
--------
हायपोथर्मिया म्हणजे काय?
मानवी शरीराचे सामान्य तपमान ९८.६ अंश फॅरनहीट असते; पण हायपोथर्मियामध्ये हे तपमान कमी होऊन ९५ अंशाच्या खाली जाते. वारा आणि थंडीमुळे शरीरातील उष्णता त्वचेतून बाहेर निघून जाते, हे रेडिएशनमुळे घडते व बाकीची फुप्फुसांद्वारे बाहेर फेकली जाते. उष्णतेच्या निर्मितीपेक्षा तिचा क्षय अधिक जलद होतो. मानवाचा मेंदू अनेक प्रकारे हे आवश्यक तापमान कायम राखत असतो. जेव्हा हे संतुलन बिघडते, तेव्हा शरीरातील उष्णतेचा क्षय होतो व त्यामुळे हायपोथर्मिया होतो.
-------
हृदयावर अल्कोहोलचा थेट परिणाम
हृदयाच्या स्नायूवर अल्कोहोलच्या थेट विषारी प्रभावामुळे, हृदय कार्यक्षमतेने रक्त पंप करू शकत नाही. या स्थितीत हार्ट फेल्युअर होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणूनच थंडीच्या दिवसात हृदयाची काळजी घेण्यासाठी मद्यपान टाळा, रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाब तपासून पाहा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करतात.
----------
सतत घाम येतोय, छातीत दुखतेय
शरीरातून जास्त घाम येणे हेदेखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते. जर थंडीतही (कमी तापमानात) घाम येत असेल तर ही समस्या अधिक गंभीर बनू शकते. अस्वस्थ दबाव, छातीत दुखणे, सुन्नपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर ही अस्वस्थता तुमचे हात, मान, जबडा किंवा पाठीवर जाणवत असेल तर तुम्ही सतर्क राहा आणि शक्य तितक्या लवकर हॉस्पिटल गाठणे गरजेचे ठरते. कारण हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही मिनिटे किंवा तास आधीची ही लक्षणे आहेत.
------
काही वेळ उष्णता जाणवते नंतर घाम
अल्कहोल हे व्हॅसोडीलायटर या औषधाच्या समकक्ष मानले जाते. यामुळे रक्तवाहिन्या ताणल्या जातात. या वाहिन्यांमधून जादा प्रमाणात रक्तवहन होऊन ते त्वचेत अधिक प्रमाणात पोहोचते. यामुळे काही वेळ उष्णता जाणवते; पण नंतर घाम येऊ लागतो. त्यानंतर थंड की उष्ण ही बाब शरीराला ओळखण्यात अडचण येते. यामुळे हायपोथर्मियाची स्थिती तयार होते.
----