दहीगावच्या पाण्याचे राजकारण करू नये : शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:19 AM2021-04-26T04:19:56+5:302021-04-26T04:19:56+5:30
ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभेज येथे दहीगाव योजनेचा कॅनॉल फुटला होता. तेव्हा तातडीने लक्ष देऊन तो दुरुस्त ...
ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभेज येथे दहीगाव योजनेचा कॅनॉल फुटला होता. तेव्हा तातडीने लक्ष देऊन तो दुरुस्त करून रब्बीचे आवर्तन २७ जानेवारी २०२१ ला सुरू केले आहे. ते आजपर्यंत अखंडितपणे सुरू आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्वच्या सर्व गावांना पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचा मानस आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
विनाकारण एखादे गाव योजनेत नसतानाही आम्हाला पाणी दिले नाही, आम्ही आंदोलन करू अशी माध्यमात प्रसिद्धी केल्यामुळे योजनाही बदनाम होते आणि समाजामध्ये चुकीचा संदेश पोहोचतो. त्यामुळे पाणी हा राजकारणाचा विषय नसून तो लोकांच्या जीवनात उन्नती आणणारा विषय आहे. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक गावाला न्याय्य प्रमाणात पाणी देण्यासाठी मी जबाबदार आहे.
दहिगाव ही उपसा सिंचन योजना असल्यामुळे विविध समस्या उद्भवतात. यामध्ये वीजपुरवठा, हायड्रो विभाग, यांत्रिक विभागाची समस्या यामुळे आवर्तनामध्ये खंड निर्माण होतो. त्याचा परिणाम म्हणून आवर्तन पुढे जाते. याचा अर्थ असा नव्हे एखाद्या गावाला विनाकारण पाणी द्यायचे नाही म्हणून चाललेले हे राजकारण आहे, हा गैरसमज नागरिकांनी दूर करावा, असे आवाहनही आ. शिंदे यांनी केले आहे.