शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:29+5:302021-03-27T04:23:29+5:30
ज्या शेकऱ्यांनी पैसे भरले आहेत परंतु त्यांची वीजजोडणी झालेली नाही अश्या शेतकऱ्यांनी तत्काळ माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन आ. ...
ज्या शेकऱ्यांनी पैसे भरले आहेत परंतु त्यांची वीजजोडणी झालेली नाही अश्या शेतकऱ्यांनी तत्काळ माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन आ. शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.
गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबिल थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडणीचे सत्र महावितरणकडून चालू आहे. यामुळे हातातोंडाला आलेली पिके अडचणीत सापडली आहेत. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी प्रतिनिधींसह महावितरणचे कार्यकारी अभियंता गवळी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसमवेत १७ मार्च रोजी पंढरपूर येथे बैठक घेऊन या बैठकीमध्ये वीजबिले टप्प्या-टप्प्याने भरण्यात यावीत, असा यशस्वी तोडगा काढला होता.
शेतकऱ्यांनी महावितरणकडे एक अश्वशक्तीसाठी १ हजार रुपयांप्रमाणे पैसे भरावेत, असे आवाहन आ. शहाजीबापू पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश शेतकऱ्यांनी ७० टक्के ते ८० टक्के रक्कम बैठकीच्या तोडग्याप्रमाणे भरणा केलेली आहे. परंतु महावितरण कंपनीकडून शेतीपंपाची तोडलेली वीज व काही ट्रान्स्फॉर्मर अद्याप सुरु न केल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान याबाबत शेतकऱ्यांनी आ. शहाजीबापू पाटील यांची भेट घेऊन महावितरणच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करीत खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती.