अफवा पसरवू नका; पंढरपूर तालुक्यातील त्या दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 03:26 PM2020-05-27T15:26:40+5:302020-05-27T15:28:42+5:30
पंढरपूर आरोग्य विभागाचे आवाहन; अफवेची पथकामार्फत केली चौकशी...
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आढीव व तारापूर गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची बुधवारी सकाळी पासून चर्चा सुरू आहे. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही, ही केवळ अफवाच असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
तारापूर येथे मुंबई येथून दादासाहेब बाबा सावंत हे आले होते. सावंत यांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. त्या चे पार्थिव मंगळवेढा तालुक्यातील सेलीवाडी येथे नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. परंतु याबाबतची माहिती पंढरपूर गटविकास अधिकारी रविकिरण घोडके व आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ त्याठिकाणी पथक पाठवले. संबंधित इसमाची इतिहास जाणून घेतला असता त्याला कोरणा ची लागण झाली नव्हती. व त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला होता. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या घरातील सर्व पाहुण्यांना संस्थात्मक कॉरंटाईनवर करण्यात आले आहे.
त्याचबरोबर आढिव ( ता. पंढरपूर) येथे ही एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत झाल्याची अफवा होती. त्यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी पथक पाठवले.
विजय दगडू पाटोळे ( वय ५५) हे कुटुंबासह पुणे येथून आढीव (ता. पंढरपूर) येथे आले होते. त्यांचा मृत्यू बुधवारी पहाटे झाला. त्यामुळे तत्काळ संबंधित व्यक्तीचा इतिहास जाणून घेतला. पाटोळे यांची कोरोनाची चाचणी झाली. त्या चाचणी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्याचा मृत्यू पोटात पाणी, कावीळ, रक्त कमी असणे या आजारामुळे झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.