रोगप्रतिकारशक्तीसाठी गावोगावी गूळवेलची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:20 AM2021-05-22T04:20:46+5:302021-05-22T04:20:46+5:30
सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असला, तरी त्यावर गावठी उपचार करण्याचे प्रकार ग्रामीण भागातून अवलंबले जात आहेत. विशेषतः आयुर्वेदात ...
सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असला, तरी त्यावर गावठी उपचार करण्याचे प्रकार ग्रामीण भागातून अवलंबले जात आहेत. विशेषतः आयुर्वेदात बहुगुणी ठरलेली गूळवेल वनस्पती सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवत असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे या गावात गूळवेल वनस्पतीची मात्रा घरोघरी लोकप्रिय ठरत आहे. या गावात कोरोना दक्षता समितीकडूनच गूळवेलच्या काड्यांचे वाटप करण्यात आले.
प्लास्टिक पिशवीत या काड्यांसोबत काढा बनवण्याची कृती, प्रतिमाणशी प्रमाण आदींची माहिती देण्यात आल्याने तिचा बोलबाला झाला. घरोघरी सकाळीच चहाऐवजी काढ्याचे सेवन आता नित्याचे झाले आहे. येथील तरुण कार्यकर्ते सकाळीच रानात जाऊन गूळवेल आणतात. आयुर्वेदात गूळवेल वनस्पती बहुगुणी मानली जाते. तिच्या सेवनाने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. भूक वाढते. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी गूळवेलचा वापर सुरू केल्याची माहिती हनुमंत कुलकर्णी यांनी दिली.
--------
चहाच्या ठेल्यातून मोफत वाटला जातो काढा
गूळवेलच्या काढ्याचे महत्त्व वाढल्याने गावातील विष्णू कलमडे या चहावाल्याने चहाऐवजी ग्रामस्थांना रोज सकाळी स्वतः काढा तयार करून मोफत वाटप सुरू केले आहे. त्याला मागणी वाढली. लहानथोर सकाळी रांगेतून त्याच्या मोफत काढ्याचा आस्वाद घेऊ लागले आहेत. विष्णूनेही चहा विकून पैसे मिळवण्यापेक्षा लोकांचे आरोग्य सांभाळण्यात धन्यता मानत दोन तास काढा तयार करण्यावर भर दिला आहे. आता तर रोज एका गल्लीत जाऊन विष्णू काढा बनवून देतो. सर्व जण याचा लाभ घेताहेत.
-----
असा बनवतात काढा
शिवारातून गूळवेल वनस्पती जमा केली जाते. तिच्या काड्या बाजूला काढून छोटे-छोटे तुकडे केले जातात. हे तुकडे रात्री पाण्यात भिजवून ठेवतात. सकाळी दगडावर त्याला ठेचून पाण्यात घालून उकळतात. पिवळसर रंग आल्यानंतर हा काढा तयार झाला, असे मानले जाते. प्रत्येकी अर्धा कप गरम काढ्याचे सेवन केले जाते.
----
------