फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:55 AM2020-02-06T10:55:48+5:302020-02-06T10:57:42+5:30
सोलापूर; रोखीच्या लेनवर वाहनांची गर्दी, अद्याप फक्त सत्तर टक्केच फास्टॅगची नोंदणी
सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर धावणाºया वाहनांना आता टोलनाक्यांवर फास्टॅगद्वारे अर्थात इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीद्वारे टोल भरणे बंधनकारक आहे़ फास्टॅग नसलेल्या वाहनांनी टोल नाक्यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास त्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकर आकारला जात आहे.
सोलापुरातील टोलनाक्यांवर अशा रोज शंभर ते सव्वाशे वाहनांवर कारवाई होत आहे़ १५ जानेवारीपासून प्रत्येक टोल प्लाझावर फक्त एका लेनवरच रोखीने टोल वसूल होत आहे़ त्यामुळे फास्टॅग नसलेल्यांची रोखीच्या लेनवर किमान अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत रांग लागलेली आहे.
चारचाकी वाहनांना ६० रुपये नियमित टोल भरावा लागतो़ फास्टॅगची नोंदणी नसल्यास चारचाकी वाहनांना दुप्पट अर्थात १२० रुपये टोल भरावा लागत आहे़ १५ जानेवारीनंतर फास्टॅग नोंदणी मोहीम देखील गतिमान झाली आहे.
रोज दोनशे ते अडीचशे नवीन फास्टॅगची नोंदणी सुरू आहे़ मागील जानेवारीत तब्बल सहा हजारांहून अधिक वाहन चालकांनी फास्टॅगची नोंदणी केलेली आहे, तर फेब्रुवारीच्या पहिल्या चार दिवसांत आठशे फास्टॅगची नोंदणी झाली आहे़ अद्याप एकूण सत्तर टक्केच फास्टॅगची नोंदणी झाली असून, ३० टक्के नोंदणी बाकी आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्पाकडून मिळाली आहे़
चालकांनी लवकर नोंदणी करून घ्यावी
- जिल्ह्यातील प्रत्येक टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी कडकपणे सुरू आहे़ फास्टॅग नसणाºयांना आता दुप्पट टोल भरावा लागत आहे़ पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील सावळेश्वर, वरवडे (जिल्हा सोलापूर) येथील पथकर नाक्यावर, सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील तामलवाडी, येडशी व पारगाव (जिल्हा उस्मानाबाद) येथील पथकर नाक्यावर नवीन फास्टॅगची नोंदणी करता येते़ तसेच एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस व इंडसइंड या बँकेत तसेच अमॅझॉन, पेटीएम, आॅनलाईन संकेतस्थळावर फास्टॅगची नोंदणी करता येते़ वाहन चालकांनी लवकरात लवकर फास्टॅगची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले़