संशयाचं काहूर मनात दाटलं; कमावत्या पत्नीच्या गळ्यावर कटर मारलं; पतीवर गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Published: August 28, 2023 04:13 PM2023-08-28T16:13:04+5:302023-08-28T16:21:39+5:30
एवढेच नाही, तर भांडण सोडविणाऱ्या सासूलाही त्याने ढकलल्याचेही फिर्यादीत म्हणण्यात आले आहे.
सोलापूर: संशयाचं भूत मानगुटीवर बसलं की, भल्याभल्याची मती हरवते. असाच प्रकार सोलापुरात घडला आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या कमावत्या पत्नीच्या गळ्यावर कटरनं वार करून तिला जखमी केले. रविवारी दुपारच्या वेळी सुशीलम्मा नगरात ही घटना घडली. ज्योती गोविंद पवार असे जखमी महिलेचे नाव आहे. तिच्या फिर्यादीनुसार पती गोविंद हणमंतू पवार (रा. शाहबादवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर भांडण सोडविणाऱ्या सासूलाही त्याने ढकलल्याचेही फिर्यादीत म्हणण्यात आले आहे.
यातील फिर्यादी आणि तिचा पती संशयित आरोपी गोविंद यांच्यात वाद असल्याने फिर्यादी आईच्या घरी सोलापुरात राहण्यास आहे. फिर्यादी नोकरी करीत असल्याने त्या ठिकाणाहून कामास जातात. यामुळे आरोपी पती गोविंदच्या मनात तिच्याबद्दल संशय निर्माण झाला. यातूनच रविवार दुपारी १२.३० च्या सुमारास गोविंद सुशिलम्मा नगरातील फिर्यादी राहत असलेल्या घरी गेला. तेथे दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. तेव्हा चारित्र्यावर संशय घेऊन गोविंद याने फिर्यादीला शिवीगाळ केली. भांडण सोडवण्यास आलेल्या सासूला ढकलून दिले. त्यानंतर हातात कटर घेऊन आरोपी फिर्यादीच्या अंगावर धावून गेला. त्याने कटरने फिर्यादीच्या डाव्या बाजूस गळ्यावर मारून जखमी केले. अधिक तपास सपोनि कुकडे करीत आहेत.