बाजारात डझनाला २५ ते ४० रुपये, तर शेतातील केळी तीन रुपये किलोने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:03+5:302021-02-07T04:21:03+5:30
कृषी कायद्याविरोधात अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, तर शेतामध्ये पिकवलेल्या उत्पन्नाचे पैसे हातात येईपर्यंत भरोसा नसल्याने शेती बिनभरवशाची ...
कृषी कायद्याविरोधात अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, तर शेतामध्ये पिकवलेल्या उत्पन्नाचे पैसे हातात येईपर्यंत भरोसा नसल्याने शेती बिनभरवशाची होत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून काही पिके शासन ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीत घेत आहे. मात्र फळबागांना याचा उपयोग होताना दिसत नाही.
सध्या किरकोळ बाजारात २५ ते ४० रुपयांपर्यंत एक डझन केळीची किंमत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर चांगल्या प्रतीच्या छाटणी केलेल्या याच केळीची किंमत तीन ते चार रुपये किलो आहे. तसेच १२ ते १६ डझन केळीचे एक क्रेट ३० ते ७० रुपयांपर्यंत शेतकऱ्याकडून घेतले जात आहे. याच केळीचे चिप्स बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून, १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे किरणा व्यावसायिक चेतन शहा यांनी सांगितले.
कोट ::::::::::::
केळीच्या पिकाला व्यापाऱ्यांकडून खरेदीसाठी प्रतिसाद मिळत नाही. पुराच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकाचे नुकसान झाले असून, ठिबक सिंचनाचे व अवर्षणाचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत. त्यामुळे शासनाकडूनच आता शेतकऱ्यांना न्याय मिळावा.
- औदुंबर शिंदे,
शेतकरी, निमगाव
कोट :::::::::::
केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे मागणी कमी झाली असून, दरही कमी आहेत. व्यापाऱ्यांना दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत क्रेटचा भाव आहे.
- असिफ बागवान,
फ्रुट कंपनी व्यावसायिक