डीपी जळाला.. पाच दिवसांपासून अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:23 AM2021-03-16T04:23:40+5:302021-03-16T04:23:40+5:30
करमाळा : महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे कंदरसह परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ४-५ दिवसांपासून निम्मे गाव अंधारात ...
करमाळा : महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे कंदरसह परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ४-५ दिवसांपासून निम्मे गाव अंधारात असल्याने नागरिकांत चीड निर्माण झाली आहे. तर उर्वरित असणारे रोहित्र (डीपी) ही रविवारी रात्री जळाल्याने पूर्ण गाव अंधारात आहे. यामुळे महावितरण विरोधात नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे लाईट वारंवार बंद होत असल्याचे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित थांबवावा. लाईट वारंवार जात असल्याने नागरिकांना उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणारे दुकानदार यांची अडचण झाली आहे, असे गाऱ्हाणे नागिरकांमधून मांडले जात आहे.
---
काही महिन्यापासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकासमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आमच्या उद्योगावर परिणाम होत आहे. महावितरणणे या सोडवणे गरजेचे आहेत.
- सूर्यकांत झिंगाडे, व्यावसायिक
---
चांगले अधिकारी द्या...
कंदर उपकेंद्रात कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे या उपकेंद्रावर कायम समस्या उद्भवत आहेत. प्रभारीवर कामकाज सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी या गावाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्वरित गावातील समस्या सोडविण्यासाठी चांगला अधिकारी देणे गरजेचे आहे.
-----