बार्शीचे सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉ. भगवान नेने काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 08:23 PM2020-01-19T20:23:12+5:302020-01-19T20:23:55+5:30
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सायंकाळी 6.38 वाजता डॉ. नेने यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोलापूर - जिल्ह्यातील नामवंत कर्करोग तज्ञ आणि बार्शीच्या नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटलचे संचालक डॉ. भगवान उर्फ शरद नेने यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. बार्शीचे दुसरे भगवंत अशी त्यांची बार्शी तालुक्यासह वैद्यकीय क्षेत्रात ओळख होती. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच बार्शी शहरात शोककळा पसरली आहे.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सायंकाळी 6.38 वाजता डॉ. नेने यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. नेने यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 11 वाजता बार्शीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. बार्शीतील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या वेद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग करिअरचा त्याग करून केवळ ग्रामीण भागातील रुग्णांसाठी त्यांनी लंडन ते बार्शी असा उलटा प्रवास केला. बार्शीला वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम नेने यांनी केलं. त्यामुळेच, बार्शी तालुक्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या शब्दाला मोठं महत्व होतं.
डॉ. नेनेंच्या निधनाची बातमी समजताच बार्शी तालुक्यात शोककळा पसरली. बार्शीतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाद्वारे डॉ. नेने यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच, जुन्या-जाणत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.