डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना ‘सरस्वती सन्मान’ १८ वर्षांनी मराठीला मिळाला मान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 07:45 AM2021-03-31T07:45:16+5:302021-03-31T07:46:30+5:30
ज्ञानपीठ पुरस्काराइतकाच तोलामोलाचा मानला जाणारा साहित्यातील ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर झाला आहे.
पुणे / सोलापूर : ज्ञानपीठ पुरस्काराइतकाच तोलामोलाचा मानला जाणारा साहित्यातील ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर झाला आहे. ‘सनातन’ या कादंबरीसाठी लिंबाळे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. १५ लाख रुपये, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विजय तेंडुलकर (१९९३) आणि महेश एलकुंचवार (२००२) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळणारे लिंबाळे हे तिसरे मराठी साहित्यिक ठरले आहेत.
दिल्लीतील के के. बिर्ला फाऊंडेशनच्या वतीने कविता, कादंबरी, नाटक, हास्य-व्यंग, ललित लेखन, आत्मकथा, समीक्षा आदी प्रकारांतील भारतीय भाषांमधील उत्कृष्ट कलाकृतींसाठी साहित्यिकांना ‘सरस्वती सन्मान’ दरवर्षी प्रदान केला जातो. त्यासाठी लेखकाची कोणत्याही भाषेतील ही साहित्यकृती सन्मानाच्या दहा वर्षे आधीच्या कालावधीत प्रकाशित झालेली असावी, असा निकष ठेवण्यात आला आहे.
डॉ. लिंबाळे यांची ‘सनातन’ ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातील इतिहासावर प्रकाश टाकते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न लिंबाळे यांनी या कादंबरीतून केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावी जन्मलेल्या डॉ. लिंबाळे यांनी दलित साहित्याला वेगळा आयाम मिळवून दिला. त्यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ‘अक्करमाशी’ची इंग्रजीसह विविध भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांची आजवर ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
जीवनवादी साहित्य
देशातल्या एखाद्या दलित लेखकाला कदाचित पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळत आहे. एका जीवनवादी साहित्याचा हा गौरव आहे. भीमा-कोरेगाव लढ्याला दोनशे वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘सनातन’ कादंबरी लिहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दलित-आदिवासींनी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. मात्र इतिहासात त्यांच्या योगदानाचा कुठेही गौरव झालेला नाही. त्यामुळे मी ‘सनातन’ मधून नवा इतिहास उभा केला.
- डॉ. शरणकुमार लिंबाळे,
ज्येष्ठ साहित्यिक