हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:16 IST2025-04-23T17:15:08+5:302025-04-23T17:16:13+5:30
राजण्णांच्या चेहऱ्यावर संताप होता. डॉक्टरांचं जाणं, तो सहन करू शकत नव्हता. मनीषावर तर प्रत्येक वाक्यात तो आगपाखड करत होता. '

हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
सोलापूर : देशभरात नावाजलेले मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मनीषाकडं इतकी पॉवर आली कुठून?..ती पैशानंही 'गब्बर' झाली होती. तिचा थाट मोठा होता; पण तिचा धनी कोण? तिला कुठून बळ मिळालं.. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस अर्थात वळसंगकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली... जुना जाणता राजण्णा (नाव बदललेले) यांनी सांगितले की, त्या बाईला घरातील एका सदस्याकडूनच ताकद मिळायची.. नाव नाही सांगत; पण तुम्ही ओळखून घ्यालच!
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
राजण्णांच्या चेहऱ्यावर संताप होता. डॉक्टरांचं जाणं, तो सहन करू शकत नव्हता. मनीषावर तर प्रत्येक वाक्यात तो आगपाखड करत होता. 'एसपी' सर गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी मुलानं सर्व कर्मचाऱ्यांना एकटे-एकटे बोलावून सरांच्या आत्महत्येबद्दल आपल्या काय भावना आहेत, हे लिहून द्यायला सांगितलं. तुमचा कोणावर आरोप असल्यास तोही सांगा, असं त्यांना सुचविण्यात आलं. कर्मचाऱ्यांनी काय ते लिहून दिलं. सर्वांनी म्हणे त्या बाईवरच संताप व्यक्त केला.
राजण्णा म्हणाले की, ही बाई श्रीमंत होत गेली. बंगला बांधला.. शेतही आहे म्हणे; पण नेमकं कुठंय ठाऊक नाही. सर्वच कर्मचाऱ्यांना तिचा जाच होता. तिचा अन्याय, अत्याचार वाढत गेल्यानंतर डॉक्टरांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता; पण तत्पूर्वी आम्हाला तर दमच भरला जायचा. कुणाच्या जीवावर उड्या मारताय आम्हाला ठाऊक आहे की,निमूटपणे काम करा, अन्यथा.. ही दमदाटी अगदी डॉक्टरांच्या घरातील एक सदस्यही करायची.. राजण्णा सांगत होते. डॉक्टर मानसिक तणावाखाली गेले होते; पण घर तुटू नये म्हणून आम्ही काही बोलणार नाही..तो पुढे म्हणाला.
जीवन असेपर्यंत जगायचे रे..
डॉक्टर वळसंगकरांच्या एका मित्राला महिन्यापूर्वी ते महापालिकेत दिसले. शहरातील काही डॉक्टरांसमवेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी ते आले होते. तेव्हा मित्र डॉ. वळसंगकरांना म्हणाला, काय सर आपण भेटत नाहीत, तब्येतही आता अशक्त वाटत आहे. असे का? यावर डॉक्टर मित्राला म्हणाले, काय रे आता आपलं काय राहिलंय? काही चालत नाही. जीवन असेपर्यंत जगायचं बघ... डॉक्टरांच्या त्या मित्रांने 'लोकमत'ला ही माहिती दिली.
डॉक्टरांचे शेवटचे कॉल!
एका माहीतगार सूत्राने सांगितले की, डॉक्टरांनी डोक्यात गोळ्या झाडून घेण्यापूर्वी तीन लोकांना कॉल केले होते. त्यातील एक जण डॉक्टरांबरोबर पूर्वी नेहमी असायचे. हॉस्पिटलच्या तंत्रज्ञानविषयक कार्यात त्यांची मदत असायची. आता या कॉलमध्ये काय बोलणं झालं, हे सांगितलं गेलं नाही.
'त्या' दिवशी सर निराश दिसले!
१ तीन महिन्यापूर्वी डॉक्टरांनी हॉस्पिटलचा चार्ज पुन्हा घेतल्यानंतर तसे दररोज ते फ्रेशच वाटायचे; पण या मनीषाच्या उद्दामपणामुळे ते व्यथित झाले होते; पण त्याचा ताण त्यांनी चेहऱ्यावर दिसू दिला नाही. नव्याने चार्ज घेतल्यानंतर ज्यांचे वेतन बारा-पंधरा हजार होते, त्यांच्या कामाचे महत्त्व आणि हॉस्पिटलवरील निष्ठा पाहून त्यांनी त्यांचे वेतन दुप्पट केले होते. ही वेतनवाढ घरातील एका सदस्याला आणि त्या बाईला मान्य नव्हती.
२ डॉक्टरांनी अखेरच्या दिवशी त्या बाईला आपल्या केबिनमध्ये बोलाविले होते. त्या दिवशी ती अशी काही तरी बोलली की, डॉक्टरांचा चेहरा पडला होता.. आम्हा कर्मचाऱ्यांना तो जाणवला.
घरामध्येही होता तणाव!
'एसपी' सर आणि मॅडममध्ये कधीच मतभेद नव्हते. दोघं एकमेकांची काळजी घ्यायचे; पण अन्य दोन सदस्यांचे मात्र एकमेकांशी पटत नव्हते. ते काही दिवस विभक्तच राहत होते. डॉक्टर मात्र दोघांच्या मध्ये कधी पडले नाहीत. त्यांना जेव्हा 'त्या' दोघांमधील मतभेद मिटविण्याची दोघातील एकानेच विनंती केली, तेव्हा तुम्ही दोघांनीच चर्चा करून भांडण संपविले पाहिजे. हवं तर माझ्यासमोर बसा; पण वाद तुम्हीच समजुतीनं मिटवा, असे डॉक्टर म्हणायचे.
शेवटी राऊंड घेतली
डॉ. शिरीष वळसंगकर हे आत्महत्या करण्याच्या दिवशीही हॉस्पिटलमध्ये आले होते. हल्ली ते फारसे पेशंटस् पाहत नसत; पण एका रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला सेकंड ओपिनियन घ्यायचे होते.
तो येणार होता म्हणून डॉक्टर थांबले होते. त्याला पाहिल्यानंतर डॉक्टरांनी मेंदू विकाराचे रुग्ण ज्या वॉर्ड किंवा रूममध्ये उपचार घेत आहेत, तिथे राऊंड घेऊन तपासणी केल्याचेही सांगण्यात आले.