डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 05:45 IST2025-04-20T05:44:24+5:302025-04-20T05:45:49+5:30
dr shirish valsangkar news: डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवे होते. त्यासाठी ते आग्रही होते; पण हल्ली रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असे.

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
सोलापूर : विख्यात मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांना त्यांच्या वळसंगकर हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने ते निराश झाले अन् त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला, अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळात दबक्या आवाजात होत आहे. याबाबत प्रतिक्रया घेण्यासाठी डॉ. वळसंगकर यांचे सुपुत्र डॉ. आश्विन यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
...म्हणे कर्मचाऱ्याकडून धमकी!
डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवे होते. त्यासाठी ते आग्रही होते; पण हल्ली रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असे. यासंदर्भात त्यांनी आक्षेप व्यक्त केला होता; पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते.
जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉ. वळसंगकर यांनी कामावरून काढून टाकले होते; पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्याबद्दल आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती.
तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला होता; पण डॉक्टरांना हे मान्य नव्हते. अखेर या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली गेले अन् त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.
गोरगरिबांची सेवा करता येत नसल्याने होते नैराश्यात
डॉक्टरांचे वडील डॉ. पद्माकर वळसंगकर हे जुन्या पिढीतील सामाजिक भान ठेवून काम करणारे रुग्णसेवक होते. त्या काळातील यशस्वी डॉक्टर होते; त्याचबरोबर नगरसेवकही होते. डॉ. शिरीष वळसंगकर हे राजकारणात सक्रिय झाले नसले तरी वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला होता.
वैद्यकीय सेवा करताना गरीब रुग्णांचे बिल ते मोठ्या प्रमाणात माफ करायचे; पण गेल्या तीन-चार वर्षांत त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारातून दूर केल्याने त्यांना गोरगरिबांची अशी सेवा करता येईना. त्यामुळे डॉ. वळसंगकर निराश झाले, अशी निकटवर्तीयांच्या चर्चेतून ऐकायला मिळाले.
अंत्यसंस्काराला मोठी गर्दी
डॉ. वळसंगकर यांच्यावर शनिवारी दुपारी मोदी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक जीवदान मिळालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना अश्रू अनावर झाले.