सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीत डीजेला परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 11:58 AM2022-04-15T11:58:02+5:302022-04-15T11:59:02+5:30
पालकमंत्र्याचा पोलिसांना निरोप; लोकांच्या आनंदावर विरजण टाकू नका
सोलापूर : गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट गडद होते. त्यामुळे सोलापूर जिल्हावासियांना खूप त्रास झाला. आता कोरोनाचे संकट संपत चालले आहे. शिवाय विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. अशा स्थितीत त्यांच्या आनंदावर विरजण न टाकता इतर जिल्ह्यात डीजेच्या परवानगीबाबत काय निर्णय झाले आहेत. याची माहिती घेऊन सोलापुरातही डीजेला परवानगी द्यावी. असा निरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना दिला आहे.
गेल्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होत आहे. कोरोना संकट संपत चालल्याने लोकांमध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे. अशा स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत डीजे वापरण्याला परवानगीने देणार नाही. अशी भूमिका पोलीस आयुक्त बैजल यांनी घेतली. त्यावरून आंबेडकरप्रेमींनी मोर्चा काढून आंदोलनही केले. ही बाब समजताच तातडीने पालकमंत्री भरणे यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. सुप्रिम कोर्टाचे आदेश आहेत हे जरूर पाहावे. कायद्याच्या चाकोरीत बसून डीजे वापरण्याला परवानगी कशा पद्धतीने देता येईल याचा विचार करा. विनाकारण अडेलतट्टू भूमिका घेऊन लोकांच्या आनंदावर विरजण टाकू नका. इतर जिल्ह्यात डीजे वापरण्याबाबत काय निर्णय झालेत याची माहिती घ्या. आणि सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत डिजे वापरण्याला परवानगी द्या. असा निरोप पालकमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना दिला.