छत्रपती संभाजी तलावात ड्रेनेजचे पाणी, वाढलेली जलपर्णी अन् दुर्गंधीयुक्त वासाने सोलापुरातील नागरिकांचे स्थलांतर
By Appasaheb.patil | Published: December 7, 2022 05:53 PM2022-12-07T17:53:07+5:302022-12-07T17:54:36+5:30
छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण व संवर्धनासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने मोठा निधी मंजूर झालेला असून जवळपास सहा कोटींचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे, त्यातून छत्रपती संभाजी महाराज तलावाचा एक पर्यटन स्थळ म्हणून विकास होणे गरजेचे होते. पण...
सोलापूर: विजापूर रोड भागातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज तलावात ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येत आहे. शिवाय जलपर्णीमुळे तसेच चिलटे, डास व दुर्गंधीयुक्त वासामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी सैनिक नगर, वसंत नगर, पोस्टल कॉलनीमधील अनेक लोक स्थलांतर करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण व संवर्धनासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने मोठा निधी मंजूर झालेला असून जवळपास सहा कोटींचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे, त्यातून छत्रपती संभाजी महाराज तलावाचा एक पर्यटन स्थळ म्हणून विकास होणे गरजेचे होते. पण या ठिकाणी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ते होताना दिसत नाही.
मध्यंतरी सहा महिने जलपर्णी काढण्याचे काम एका ठेकेदाराकडून करून घेण्यात आले. त्याला लाखो रुपये खर्च झालेला पैसा वाया जात आहे. या भागातील नागरिकांकडून वसाहतीतील ड्रेनेजचे पाणी या तलावात सोडले जाते. त्यामुळे या तलावातील पाण्याला उग्र दुर्गंधी सुटली असून अनेक तलावातील जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आहे.
संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन -
छत्रपती संभाजी तलावात वाढत असलेली जलपर्णी, दुर्गंधी वाढत असल्याने संभाजी ब्रिगेडने महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त विजय खरोटे यांना जलपर्णीचा पुष्पगुच्छ देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. याचवेळी शहर संघटक दत्ता जाधव यांनी अंगावर जलपर्णी वस्त्र धारण करून लक्ष वेधले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, अमित जाधव, राहुल सावंत, राजेंद्र माने, सीताराम बाबर, श्रीकांत कोळी इत्यादी उपस्थित होते.