सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना ड्रेसकोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:44 AM2018-09-25T11:44:50+5:302018-09-25T11:47:39+5:30
शिक्षण समितीत चर्चा : संगणक, कपाट मागणीचे भरमसाट प्रस्ताव; १००० शाळांसाठी प्रोजेक्टरची मागणी
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय सभेने घेतला आहे, त्यामुळे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. फक्त ड्रेसचा रंग व खर्चाबाबत अधिकृत शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती शिवानंद पाटील यांनी दिली.
शिक्षण व आरोग्य समितीची बैठक सभापती शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला शिक्षण समितीचे सदस्य रणजितसिंह शिंदे, गोविंद जरे, संजय गायकवाड, स्वाती कांबळे व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्राथ. व माध्य.च्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. बºयाच झेडपी शाळांनी संगणक व प्लास्टिक कपाटाची मागणी केली. एनटीपीसीच्या २०१८-१९ च्या सीएसआर फंडातून १००० शाळांसाठी संगणक, प्रोजेक्टर मिळण्याची मागणी केली. जिल्हाधिकाºयांनी हा प्रस्ताव एनटीपीसीला दिल्याचे सांगण्यात आले. शाळांना फायबर कपाट देण्याचे अनेक प्रस्ताव आले परंतु इतके प्रस्ताव मंजूर करणे अवघड आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रशाळांना कपाट देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गटशिक्षण अधिकाºयांनी तालुक्यातील एक आदर्श शाळा तयार करावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांची संख्यावाढ, डिजिटल शाळा, परिसर स्वच्छता आदी उपक्रम राबविण्याची जबाबदारी राहणार आहे. या शाळांच्या सुधारणेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी २0 लाखांची मागणी करण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यातील एका शाळेत दहा लाख देण्याचे नियोजन आहे. शाळा दुरुस्तीसाठी १२ कोटी १५ लाखांचे प्रस्ताव आले आहेत. पण समितीकडे केवळ दीड कोटीचा निधी उपलब्ध आहे.