अफगाणिस्तानातून ड्रायफ्रूट्स येईना; आता भिस्त स्पेन, इराणवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:05+5:302021-08-20T04:27:05+5:30

सोलापूर : अफगाणिस्तानातील तणावाच्या वातावरणाचा परिणाम ड्रायफ्रूट्सच्या व्यापारावर झाला आहे. मागील चार दिवसांपासून अफगाणिस्तानातून ड्रायफ्रूट्सच्या गाड्या येणे बंद झाल्या ...

Dried fruits did not come from Afghanistan; Now on to Spain, Iran! | अफगाणिस्तानातून ड्रायफ्रूट्स येईना; आता भिस्त स्पेन, इराणवरच!

अफगाणिस्तानातून ड्रायफ्रूट्स येईना; आता भिस्त स्पेन, इराणवरच!

Next

सोलापूर : अफगाणिस्तानातील तणावाच्या वातावरणाचा परिणाम ड्रायफ्रूट्सच्या व्यापारावर झाला आहे. मागील चार दिवसांपासून अफगाणिस्तानातून ड्रायफ्रूट्सच्या गाड्या येणे बंद झाल्या आहेत. आता व्यापारी अफगाणिस्तानावर विसंबून न राहता स्पेन, इराणमधील माल मागविण्याच्या विचारात आहेत. सध्या मुंबईतच मालाचा तुटवडा असल्याने सोलापूरच्या व्यापाऱ्यांना आणखी काही दिवस वाटच पाहावी लागणार आहे. परिणामी ड्रायफ्रूटसच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.

अफगाणिस्तानावर तालिबान दहशतवादी संघटनेने हल्ला करून कब्जा मिळविला आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाला आहे. अफगाणिस्तानातील कंदार, काबूल शहरातून पिस्ता, अंजीर, जर्दाळू, खिसमिस, काळा मणुका, बदाम, खजूर, केसर आदी ड्रायफ्रूट्स मागविले जातात. या तणावाच्या वातावरणामुळे गेल्या चार दिवसांपासून मालच आलेला नाही. सोलापूरचे व्यापारी रोज मुंबईच्या व्यापाऱ्यांच्या संपर्कात असतात. मात्र, मालच आलेला नाही, कधी येईल हे सांगता येत नाही, स्पेन, इराणच्या व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडूनही माल येण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस वाटच पाहावी लागणार आहे.

..............

..अशी झाली दरात वाढ

ड्रायफ्रूट्स तणावपूर्वीचे दर आताचे दर.

पिस्ता : १६०० २०००

बदाम : ८०० ११००

अंजीर : १४०० १६००

खिसमिस : ४५० ७००

जर्दाळू : ६०० ७००

काळे मणुके : २८० ३००

..........

आलेला माल खराब निघाला

जहाजाने वाशी मार्केटमध्ये चार-पाच दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातून अंजीरचे चार ते पाच कंटेनर पाठविण्यात आले होते. माल पूर्णपणे खराब निघाला. त्या मालावरच प्रक्रियाच केली नव्हती. कोल्ड स्टोरेज उपलब्ध न झाल्याने अंजीर पूर्णपणे काळा पडल्याचे मुंबईतील व्यापाऱ्यांनी सांगितले.

.........

पंधरा दिवस पुरेल एवढाच स्टॉक शिल्लक

सोलापूरच्या बाजारात सध्या पुढील पंधरा दिवस पुरेल एवढाच ड्रायफ्रूट्सचा माल उपलब्ध आहे. तोपर्यंत माल न आल्यास तुटवडा निर्माण होणार आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास दिवाळीत दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

.........

दर पूर्ववत होण्यास एक वर्ष लागेल

आता ड्रायफ्रूट्सच्या दरात वाढ होत आहे. येणाऱ्या काळात त्या आणखी वाढच होणार आहे. जोपर्यंत अफगाणिस्तानातील परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत दरही कमी होणार नाही. त्यासाठी आता किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

- नागनाथ अक्कलकोटे, व्यापारी

......

मुंबईतील व्यापारी अफगाणिस्तानातील व्यापाऱ्यांशी संवाद साधत आहेत. काही दिवस थांबा. परिस्थिती सुधारेल आणि माल पाठविण्याची व्यवस्था होईल, सांगण्यात येत आहे. तोपर्यंत दर वाढतच राहणार आहे.

- नंदकिशोर तिवाडी, व्यापारी

Web Title: Dried fruits did not come from Afghanistan; Now on to Spain, Iran!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.