कोणावर विश्वास ठेवायचा.. गाडीवरील ड्रायव्हरनंच केलं कपाट रिकामं अन् लाटली दहा लाखांची रोकड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 09:19 PM2023-02-20T21:19:04+5:302023-02-20T21:19:14+5:30
जुळे सोलापुरातील प्रकार : गुन्हे शाखेनं बारा तासात शोधून काढला चोर, जप्त केला मुद्देमाल
विलास जळकोटकर
सोलापूर : घरात ठेवलेली लाखोंची रक्कम पाहून गाडीवर ठेवलेल्या ड्रायव्हरचं मन फिरलं. परिस्थिती गरिबीची, लग्न जमत नाही म्हणून धाडस केलं आणि कपाट फोडून त्यानं चक्क १० लाखांची रोकड चोरुन गायब झाला. कोणाला सुगावा लागू नये म्हणून फोनही बंद ठेवला. जुळे सोलापुरातील सानवी अपार्टमेंटमधील संतोष कुलकर्णी यांच्या घरात १७ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून अवघ्या १२ तासात चोराला शोधून काढलं. तो मालकाचा ड्रायव्हर निघाला. त्याच्याकडून चोरीला गेलेली सर्व रक्कम जप्त केली.
जुळे सोलापूर येथील द्वारकाधीर मंदिराजवळ सानवी अपार्टमेंटमध्ये संतोष कुलकर्णी यांचा फ्लट आहे. सध्या ते इंद्रधनू येथील फ्लॅटमध्ये राहतात. कुलकर्णी यांना शेतीच्या उत्पनातून मिळालेली १० लाख रुपये रोकड सानवी अपार्टमेंटमधील बेडरुमच्या कपाटात डिसेंबर २०२२ मध्ये विभागून ठेवली होती. ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी ही रक्कम तपासून पाहिली असता ती तेथे दिसून आली नाही. फ्लॅटचे कुलूप, कडी तुटल्याचे दिसून आले. हा प्रकार जवळच्याच कोणीतही केली असावी, असा संशय कुलकर्णी यांना आला. जवळच्या व्यक्तींकडे विचारपूस करुनही कोणी काही सांगितले नाही. अखेर त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.
ड्रायव्हरचा फोन बंद
गुन्हा नोंदल्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सपोनि संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. फिर्यादी कुलकर्णी व या फ्लॅटवर येणाऱ्या-जाणाऱ्यांची माहिती घेतली. सध्या त्यांच्याकडे असलेला चालक असलेल्या सर्वांकडे प्राथमिक माहिती घेतली. अधिक चौकशी करताना कुलकर्णी यांचा खासगी वाहनचालक नागेश उर्फ अमित सूर्यकांत भरडे (वय- ३४, चालक, रा. १३१३ उत्तर कसबा, टिळक चौक सोलापूर) याचा फोन गुन्हा नोंदल्यापासून बंद असल्याचे लक्षात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, राजू मुदगल, कुमार शेळके, महेश शिंदे, कृष्णात कोळी, सिद्धाराम देशमुख, प्रवीण शेळकंदे, रत्ना सोनवणे, सतीश काटे यांनी केली.
सोलापूर सोडून जाण्याच्या तयारीतचालकाचा फोन बंद असल्यामुळे पथकाचा संशय बळावला. त्याचा शोध घेतला असता त्याच्या घरी व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र तो आढळला नाही. गुन्हे शाखेच्या पथकाने आपल्या पद्धतीने शोध मोहीम सुरु केली. १८ फेब्रुवारीला खबऱ्यामार्फत कुलकर्णी यांच्या ड्रायव्हर भरडे यानेच चोरी मिळाल्याची खबर मिळाली. तो सोलापूर सोडून जाण्याच्या तयारीत असून, लवकरच फोटफाडी चौकात येणार असल्याची महत्त्वाची माहिती मिळाली.
खिशात जागेवरच मिळाले दोन लाख
क्षणाचा विलंब न लावता पथक सक्रीय झाले. पोटफाडी चौकात पोलीस दबा धरुन बसले. खबऱ्याच्या माहितीनुसार फिर्यादीचा गाडीवरील चालक संशयित आरोपी नागेश उर्फ अमित भरडे तेथे आला. तेथे पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली. चोरलेल्या रकमेपैकी २ लाख रुपये खिशात सापडले.
लग्नासाठी चोरली रोकड
दोन लाख मिळाल्यानंतर पथकाने चालकाला विश्वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला. मग त्यांने परिस्थिती गरीब असल्यानं लग्न जमत नव्हते. पगारही कमी असल्याने लग्नासाठी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले आणि चोरलेले उर्वरीत ८ लाखही काढून दिले. अशा प्रकारे १७ रोजी गुन्हा नोंदला आणि १८ फेब्रुवारीला रोजी गुन्हा नोंदल्यापासून १२ तासात या चोरीचा छडा लागला.