तीव्र चढउतार अन् रस्त्यांमुळे लागतेय ट्रॅक्टरसह चालकांची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:06+5:302020-12-16T04:37:06+5:30
ट्रॅक्टर ग्रामीण भागातील विशेषत: कृषी क्षेत्राचा अविभाज्य घटक समजला जातो. सध्या सुरू असलेल्या ऊस तोडणी हंगामात शेता-शिवारात राबणारे ट्रॅक्टर ...
ट्रॅक्टर ग्रामीण भागातील विशेषत: कृषी क्षेत्राचा अविभाज्य घटक समजला जातो. सध्या सुरू असलेल्या ऊस तोडणी हंगामात शेता-शिवारात राबणारे ट्रॅक्टर रस्त्यावर वावरताना दिसतात. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिवृष्टीच्या तडाख्यात उखडलेले रस्ते, वाहनांची गर्दी, तीव्र चढ व उताराचे रस्ते अशा ठिकाणी एरव्ही वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची हातोटी वाखाणण्याजोगी ठरत आहे. यात धाडस, कष्ट व चिकाटी अशा विविध पैलूंचे दर्शन अनेक ठिकाणी घडत आहे.
ऊस वाहतुकीची कसोटी
साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या बहुतांश रस्त्यांवर तीव्र चढ अथवा उताराचा सामना ऊस वाहतुकदारांना करावा लागतो. यामध्ये रात्री-अपरात्री चालक-मालकांची धावपळ अनेक ठिकाणी लक्ष वेधताना दिसते. यामध्ये उसाने भरलेल्या ट्रॉल्या खाली येण्यापासून रोखण्यासाठी दगड घेऊन चालणारे, उतारांना पुढे वाहन आडवे येऊ नये, यासाठी हातवारे करणारे, तीव्र लढ्यापूर्वी थांबून विश्रांती घेत दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने ट्रॉल्या वर खेचणारे अशा प्रकारचे विविध चित्र सध्या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत.
----जड व झुलते वजन असल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला चालवून चालत नाही. रस्त्यांची समस्या कायमची आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने चढ-उतार व खराब रस्त्यावर आव्हानात्मक गोष्टी स्वीकारणे नित्याची गोष्ट ठरत आहे.
- ब्रम्हदेव हुलगे, ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालक व मालक
फोटो :
माळशिरस-म्हसवड रस्त्यावर जळभावी येथील घाट चढून जाण्यासाठी हवा, पाणी तपासून तयारी करतानाचे छायाचित्र.